मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : तालुक्यातील आडविहीर शिवारात ९ मे रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास गोठ्याला अचानक भीषण आग लागून एका बैलाचा होरपळून मृत्यू झाला, तर चार गायी गंभीररित्या भाजल्या. या आगीत शेतीउपयोगी साहित्यही जळून खाक झाल्याने शेतकरी भागवत वसंत साबे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आडविहीर येथील गट क्रमांक ३२२ मध्ये भागवत वसंत साबे यांचे शेत असून गुरांसाठी शेतात बांधलेल्या गोठ्याला अचानक आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केल्याने संपूर्ण गोठा भस्मसात झाला. आगीदरम्यान गोठ्यात बांधलेला एक बैल गंभीर भाजल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, तर चार गायी भाजून जखमी झाल्या.
या आगीत २० नग पीव्हीसी पाइप, दीड एकरातील ठिबकसंच, चार ट्रॉली कडबा कुट्टी, २१ टीनपत्रे, पंप, तीन ताडपत्र्या, पाच पोती ढेप, सहा बॅग सुग्रास तसेच चार बॅग मका भरडा जळून खाक झाले. त्यामुळे पशुधनासह शेतीसाहित्याचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच ग्राम महसूल अधिकारी एन. एस. देवकर यांनी १० मे रोजी पंचासमक्ष घटनास्थळी पंचनामा केला. नुकसानीचा अहवाल तहसीलदारांकडे सादर करण्यात आला असून शेतकऱ्याला शासनस्तरावरून आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
यावेळी विशाल साबे, अमोल खर्चे, ऋषीकेश साबे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान, आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.














