अंढेरा/मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज) – चिखली तालुक्यातील अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीतून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची घटना उघडकीस आली आहे. तर नांदुरा तालुक्यातील बेलुरा येथून २२ वर्षीय तरुणी कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेल्याने बेपत्ता झाली आहे. या दोन्ही घटनांमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी स्वतंत्र गुन्हे दाखल करून तपास सुरू केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अंढेरा हद्दीतील संबंधित अल्पवयीन मुलगी १५ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी घरातून बाहेर गेल्यानंतर परतली नाही.
कुटुंबीयांनी परिसरात तसेच नातेवाईकांकडे शोधाशोध केली, मात्र तिचा काहीच मागमूस लागला नाही. याच कालावधीत गावातील एक युवकही बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली असून, त्यानेच मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी अंढेरा पोलिसांत भारतीय न्याय संहितेच्या कलम १३७ (२) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, बेलुरा (ता. नांदुरा) येथील पुनम वासुदेव मुंढे (वय २२) ही तरुणी २६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०.३० ते सायंकाळी ६ वाजेदरम्यान घरातून कोणालाही न सांगता निघून गेली. कुटुंबीयांनी तिचा सर्वत्र शोध घेतला, नातेवाईक व मित्रमैत्रिणींकडे चौकशी केली, मात्र ती आढळून आली नाही. अखेर वडील वासुदेव कडू मुंढे यांनी बोराखेडी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर मिसिंगची नोंद करण्यात आली आहे.
दोन्ही घटनांमध्ये संबंधित मुलगी व तरुणीबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास त्वरित संबंधित पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.












