बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) – बुलढाणा जिल्ह्यात तरुण मुली आणि महिला बेपत्ता होण्याच्या वाढत्या घटनांनी गंभीर चिंता निर्माण झाली असून पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दररोज मिसिंगच्या नोंदी वाढत असताना, या प्रकरणांच्या तपासात अपेक्षित गती दिसून येत नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
बुलढाणा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ओम साई अपार्टमेंटसमोर राहणारी केतकी सखाराम भुसारी (वय १८) ही तरुणी १८ एप्रिल रोजी सकाळी ९ ते ११ वाजताच्या दरम्यान अचानक बेपत्ता झाली. फिर्यादी सखाराम भुसारी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संबंधित तरुणी घरातील स्टीलच्या डब्यात ठेवलेले १५ लाख रुपये रोख घेऊन निघून गेल्याचा संशय आहे. या प्रकरणात साखळी खुर्द येथील उमेश सुरेश वाघ याच्यावर संशय व्यक्त करण्यात आला आहे.
भरदिवसा शहराच्या वर्दळीच्या भागातून तरुणी मोठी रोकड घेऊन बेपत्ता होणे ही अत्यंत गंभीर बाब मानली जात असून या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. नेमके ही तरुणी स्वखुशीने गेली की तिला फूस लावून नेण्यात आले, याबाबत पोलीस तपास सुरू असल्याचे समजते.
दरम्यान, दुसरी घटना बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील साखळी बुद्रुक येथे घडली. चैताली रमेश बोराडे (वय १८ वर्षे १९ दिवस) ही तरुणी १६ एप्रिलच्या मध्यरात्री घरातून बेपत्ता झाली. आई व लहान भाऊ झोपेत असताना ती कुणालाही न सांगता निघून गेल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणातही फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
या दोन घटनांमुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित झाले असून पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणांकडे वैयक्तिक लक्ष द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे. केवळ ‘मिसिंग’ची नोंद करून प्रकरणे थंडबस्त्यात न टाकता, विशेष शोध पथके नेमून दोन्ही तरुणींचा तातडीने शोध घ्यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
विशेषतः १५ लाख रुपयांसह तरुणी बेपत्ता होणे आणि दुसरी तरुणी मध्यरात्री गायब होणे, या दोन्ही घटनांनी अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. या प्रकरणांचा सखोल तपास करून सत्य समोर आणणे आणि संबंधित मुलींना सुरक्षित परत आणणे, हीच आता पोलीस प्रशासनापुढील खरी कसोटी ठरणार आहे.













