Advertisement Advertisement

दारू पिऊन शाळेत येतो म्हणे शिक्षक;काही घेणंदेणं झालं का? कारवाई थांबल्याने संशयाचे ढग गडद…

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): चिखली तालुक्यातील शेळगाव आटोळ सर्कलमधील एका शिक्षकाविरोधात गंभीर चर्चा रंगू लागली असून, दारूच्या नशेत शाळेत येत असल्याच्या आरोपांवरून ग्रामस्थ आणि पालक संतप्त झाले आहेत. “कारवाई का थांबली?”, “काही घेणंदेणं झालं का?”, असे थेट सवाल आता शिक्षण विभागावर उपस्थित होत आहेत. जर संबंधित शिक्षकावरचे आरोप खोटे असतील, तर त्यांची तात्काळ मेडिकल टेस्ट करून सत्य बाहेर आणावे, अशी चर्चा आज पंचायत समिती आवारात रंगली होती.

गावकऱ्यांचे म्हणणे आहे की, जर एखादा शिक्षक खरोखरच दारू पिऊन शाळेत येत असेल, तर तो केवळ विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळत नाही, तर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेलाच काळिमा फासतो. अशा प्रकारामुळे आधीच अडचणीत असलेल्या ग्रामीण शाळांची प्रतिमा मलीन होत असून, विद्यार्थी संख्या घटण्यामागेही अशा बेजबाबदार वर्तनाचा मोठा वाटा असल्याची चर्चा सुरू आहे. “शिक्षण विभाग झोपलाय का?” असा सवाल आता उघडपणे विचारला जात आहे.

विशेष म्हणजे, संबंधित प्रकरणात अद्याप ठोस कारवाई न झाल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. “कारवाई थांबवण्यासाठी काही व्यवहार झाला का?”, अशी कुजबूजही परिसरात सुरू असून, त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पालक आणि ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, शिक्षण विभागाने तत्काळ चौकशी करून दोषी आढळल्यास कठोर कारवाई करावी, अन्यथा हे प्रकरण जिल्हा परिषद पातळीवर नेले जाईल.

दरम्यान, या प्रकारामुळे शेळगाव आटोळ सर्कलमध्ये संतापाची लाट उसळली असून, “बेवड्या शिक्षकांमुळे शाळा उद्ध्वस्त होत आहेत आणि अधिकारी डोळेझाक करत आहेत,” अशा संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. आता शिक्षण विभाग या प्रकरणात जागा होऊन कारवाई करणार की ग्रामस्थांना आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!