Advertisement Advertisement

धरणातील गाळ वाहतूक करताना ट्रॅक्टर पलटी; शेतकऱ्याचा मृत्यू, मात्र सोबत असलेल्या नातू….

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील निळेगाव फाटा, रामनगर शिवार येथे रविवारी सकाळी झालेल्या दुर्दैवी अपघातात ट्रॅक्टर पलटी होऊन एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला, तर ट्रॅक्टरवर सोबत असलेला त्यांचा नातू सुदैवाने बचावल्याने मोठा अनर्थ टळला.

मिळालेल्या माहितीनुसार, विनोद रामकृष्ण वाकोडे (वय ५५, रा. आबाद नगर, बाळापूर, जि. अकोला) हे ट्रॅक्टरने धरणातील गाळ वाहतूक करत होते. रविवारी सकाळी निळेगाव फाटा परिसरातून जात असताना अचानक ट्रॅक्टरचा ताबा सुटल्याने वाहन पलटी झाले. या भीषण अपघातात विनोद वाकोडे हे ट्रॅक्टरखाली दबले गेले.

अपघातानंतर परिसरातील नागरिक आणि नातेवाईकांनी तातडीने धाव घेत त्यांना बाहेर काढून खामगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.

या अपघातात ट्रॅक्टरवर असलेला त्यांचा नातू थोडक्यात बचावला असून, त्याला कोणतीही गंभीर दुखापत झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे एका बाजूला कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असताना दुसरीकडे नातू बचावल्याने काहीसा दिलासा व्यक्त केला जात आहे.

या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!