देऊळगाव मही (बुलडाणा कव्हरेज न्युज) : तालुक्यातील दगडवाडी येथे शुक्रवारी (दि. १० एप्रिल) मध्यरात्री शॉर्टसर्किटमुळे घराला लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाले. आग विझवण्याच्या प्रयत्नादरम्यान झालेल्या गॅस सिलेंडरच्या स्फोटात सात जण जखमी झाले असून, अग्निशामक दल वेळेत पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, कारभारी दिपाजी नागरे यांचे घर मध्यरात्रीच्या सुमारास पेट घेतले. शेजारील सौंदा उगलमुगले हे बाहेर आल्यावर त्यांना आग लागल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ गावकऱ्यांना जागे करून सरपंचांशी संपर्क साधला. सरपंच पती यांनी पोलिस निरीक्षक ब्रह्मगिरी यांना माहिती देत अग्निशामक दलाला पाचारण केले.
दरम्यान, गावकऱ्यांनी सुरुवातीला पाण्याच्या बाटल्यांच्या सहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, याच वेळी घरातील गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. स्फोटामुळे घरावरील पत्रे व दगड दूरवर फेकले गेले आणि एकच गोंधळ उडाला. मदत करणारे अनेक ग्रामस्थ जखमी झाले.या घटनेत आर्यन शंकर घुगे याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याला १८ टाके पडले आहेत. इतर सहा जण किरकोळ जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाची गाडी व पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. गावकऱ्यांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात यश आले. परिसरात इतर घरे लागून असल्याने मोठा धोका निर्माण झाला होता; मात्र वेळीच कारवाई झाल्याने पुढील अनर्थ टळला.
या आगीत घरातील धान्य, महत्त्वाचे साहित्य, कागदपत्रे तसेच घराचे मोठे नुकसान झाले असून लाखोंचा फटका बसला आहे. सुदैवाने घरात कोणीही नसल्याने जीवितहानी टळली.
या घटनेत पोलिस निरीक्षक ब्रह्मगिरी, अग्निशामक दलाचे चालक मापारी, तसेच गावकऱ्यांनी तत्परतेने मदत केल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.












