बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्यभरातील पदाधिकारी, निवडक कार्यकर्ते आणि युवा शेतकरी पुत्रांसाठी दोन दिवसीय राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर महाबळेश्वर तालुक्यातील तापोळा येथे ८ एप्रिलपासून सुरू होणार असून ९ एप्रिल रोजी समारोप होणार आहे.
या शिबिरात शेतकरी चळवळीचा इतिहास, भविष्यातील दिशा, ध्येयधोरणे तसेच कृषीपूरक उद्योग, व्यवसाय आणि रोजगार निर्मिती या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे. संघटन कौशल्य, वैचारिक बैठक आणि नेतृत्व विकासावरही विशेष भर दिला जाणार असून विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हे शिबिर पार पडणार आहे. शेतकरी चळवळीतील मरगळ दूर करून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याच्या उद्देशाने हे आयोजन करण्यात आले आहे. युवकांना शेतीपूरक उद्योगांकडे वळवून रोजगार निर्मितीला चालना देण्यावरही भर दिला जाणार आहे.
या दोन दिवसीय शिबिरादरम्यान राज्य कार्यकारिणीची बैठकही होणार असून संघटनेची पुढील दिशा, संभाव्य आंदोलने आणि नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाणार आहेत. राज्यभरातील निवडक पदाधिकारी आणि शेतकरी चळवळीत कार्यरत युवक या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
शिबिरात वैचारिक मंथन, गटचर्चा, प्रश्नोत्तरे आणि सादरीकरण अशा विविध उपक्रमांचा समावेश असणार असून हे शिबिर कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष राजकुमार कसबे व राज्य समन्वयक सचिन पांडुळे यांनी दिली आहे.
तुपकरांच्या भूमिकेकडे लक्ष….
प्रदीर्घ कालावधीनंतर रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात राज्यव्यापी बैठक होत असल्याने त्यांच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आक्रमक आंदोलनाची घोषणा होणार की राज्याच्या राजकारणात खळबळ उडवणारा नवा निर्णय जाहीर होणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. यापूर्वीच्या बैठकींमध्ये तुपकरांनी आंदोलनांचे मोठे निर्णय जाहीर केले असल्याने यावेळीही काही मोठी घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.















