उदयनगर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : उदयनगर-हरणी मार्गावरील बेलासरी शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेने एका अस्वलाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना ३० मार्चच्या रात्री घडली असून ३१ मार्च रोजी सकाळी ती समोर आली.
जाहिरात 👆
मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या सुमारास रस्ता ओलांडत असताना अस्वलाला भरधाव अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यात अस्वल जागीच ठार झाले. सकाळी स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास ही बाब येताच वनविभागाला माहिती देण्यात आली.
उदयनगर परिसर हा ज्ञानगंगा अभयारण्यालगत असल्यामुळे येथे अस्वल, बिबट यांसारख्या वन्यप्राण्यांची वर्दळ मोठ्या प्रमाणात आढळते. हरणी, वैरागड, किन्ही सवडत आदी भागात शेतात काम करताना शेतकऱ्यांना हे प्राणी वारंवार दिसून येतात. गेल्या काही वर्षांत या वन्यप्राण्यांची संख्या वाढल्याचेही स्थानिकांकडून सांगितले जाते. यामुळे काहीवेळा शेतकऱ्यांवर हल्ल्याच्या घटनाही घडल्या आहेत.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे आरएफओ वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली नेवरे, आर. डी. पैठणे, तसेच रेस्क्यू टीमचे संदीप मडावी आणि इतर वनपाल, वनरक्षक व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पंचनामा करून मृत अस्वलाला शासकीय वाहनाद्वारे उत्तरीय तपासणीसाठी पाठविले.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून वन्यप्राण्यांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.













