मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज) भंडाऱ्यात जेवणाच्या पंगतीत बसण्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाने गंभीर वळण घेत तिघांनी एका व्यक्तीस जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना नांदुरा तालुक्यातील पिंपळगाव खुटा येथे घडली आहे. या प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून परिसरात खळबळ उडाली आहे.
प्रभाकर रामराव अढाव (रा. पिंपळगाव खुटा) यांनी बोराखेडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीनुसार, २७ मार्च रोजी गावातील भंडाऱ्यात जेवणाच्या पंगतीत बसण्याच्या कारणावरून वाद उद्भवला. या वेळी गजानन भीमराव कडुकार याने फिर्यादीस अश्लील शिवीगाळ केली.
वाद अधिक चिघळताच गिताबाई भीमराव कडुकार व रमेश रामभाऊ कडुकार यांनीही शिवीगाळ करत फिर्यादीला कुऱ्हाडीने तुकडे करून ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे भंडाऱ्यात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
फिर्यादीच्या तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी गजानन कडुकार, गिताबाई कडुकार आणि रमेश कडुकार या तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २९६, ३५१(२), ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय सुरळकर करीत आहेत.














