बुलढाणा(बुलडाणा कव्हरेज न्युज) – जिल्ह्यातील रस्ते विकासाला चालना देण्यासाठी केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन सीआरएफ अंतर्गत निधी उपलब्ध करून देण्याची महत्त्वपूर्ण मागणी केली आहे.
देशाच्या प्रगतीत रस्ते हे मुख्य आधारस्तंभ मानले जातात. आर्थिक विकास, दळणवळण आणि सामाजिक एकात्मता यासाठी सुसज्ज रस्ते अत्यावश्यक आहेत. आधुनिक रस्त्यांमुळे कृषी, उद्योग आणि व्यापाराला चालना मिळते तसेच ग्रामीण भाग शहरांशी जोडला जाऊन रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतात. या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातही अधिक सक्षम आणि दर्जेदार रस्त्यांची गरज असल्याचे जाधव यांनी अधोरेखित केले.
केंद्र सरकारच्या माध्यमातून बुलढाणा लोकसभा मतदारसंघात अनेक महामार्गांची निर्मिती झाली असली, तरी काही महत्त्वाचे रस्ते प्रकल्प अद्याप प्रलंबित आहेत. हे प्रकल्प सीआरएफ अंतर्गत पूर्ण झाल्यास जिल्ह्यातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम होईल, असा विश्वास जाधव यांनी व्यक्त केला.
यासोबतच नांदुरा येथील रेल्वे क्रॉसिंगचा प्रश्नही त्यांनी गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिला. या ठिकाणी उड्डाणपूल किंवा अंडरपास नसल्यामुळे जळगाव जामोद आणि संग्रामपूर या आदिवासी भागांकडे जाणाऱ्या नागरिकांना रेल्वे येईपर्यंत दीर्घकाळ थांबावे लागते. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून, या समस्येवर तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील रस्ते विकासासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन नितीन गडकरी यांनी दिल्याची माहिती मिळाली असून, या निर्णयामुळे बुलढाण्यातील पायाभूत सुविधांना मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे














