देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज):
देऊळगाव राजा ते देऊळगाव मही या मार्गावर बसने प्रवास करत असताना एका महिलेच्या पिशवीतून सोन्याचे दागिने चोरणाऱ्या चार महिला आरोपींना देऊळगाव राजा पोलिसांनी गोपनीय माहिती व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अटक केली आहे. ही कारवाई ९ फेब्रुवारी रोजी करण्यात आली.
पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक बुलढाणा अमोल गायकवाड, अपर पोलीस अधीक्षक खामगाव श्रेणिक लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या आदेशानुसार ही कारवाई यशस्वीरीत्या पार पडली.
याप्रकरणी देऊळगाव राजा पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक ६२/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(४), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे नंदिनी सुरी गड्डी (वय २२), पार्वती राकेश गड्डी (वय २०), कस्तुरी राम गड्डी (वय २०) तिन्ही रा. पाण्याच्या टाकीजवळ, सोलापूर तसेच लक्ष्मी व्यंकटेश मच्छा (वय २५) रा. पाण्याच्या टाकीजवळ, माजलगाव अशी आहेत.
फिर्यादी फेमिना बी. नूर मोहम्मद यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ४ फेब्रुवारी रोजी बसमधून प्रवास करत असताना चार अज्ञात महिलांनी त्यांच्या पिशवीतून सोन्याची मणी असलेली पोत व १७ नग पुतळ्या असलेली पोत असा अंदाजे दोन लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता.
तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू करून गोपनीय माहिती व सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने देऊळगाव राजा येथून चारही महिला आरोपींना ताब्यात घेतले. फिर्यादीने आरोपींची ओळख पटविल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाईसाठी पोलिस कोठडीत देण्यात आले आहे.
ही कारवाई पीएसआय नितीन मिंड यांच्या नेतृत्वाखाली हेड कॉन्स्टेबल दिगंबर कपाटे, महिला हेड कॉन्स्टेबल वनिता शिंगणे, पोलीस कॉन्स्टेबल मनोज खरडे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.














