बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) जिल्ह्यात प्रशासनाकडून रेती घाटांची हरिसी पूर्ण करण्यात आली असून बहुतांश घाट कार्यान्वित झाले आहेत. सिंदखेड राजा तालुक्यातील दुसरबीड येथील रेती घाटाचाही लिलाव झाल्यानंतर तेथे मोठ्या प्रमाणावर नियमबाह्य रेती उपसा सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या अवैध उपशामुळे खडकपूर्णा नदीपात्रातील पाण्याची पातळी लक्षणीयरीत्या घटली असून येत्या मार्च ते जून या कालावधीत परिसराला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर दुसरबीड येथील रेती घाट तातडीने बंद करण्यात यावा, अशी मागणी अविनाश चव्हाण व शेख इरफान शेख समव यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. हे निवेदन २ फेब्रुवारी रोजी सादर करण्यात आले.
दुसरबीड गावालगतून खडकपूर्णा नदी वाहते. नदीकाठावर शासनामार्फत रेती घाटाचा लिलाव करण्यात आला असून तेथून मोठ्या प्रमाणावर रेतीचा उपसा केला जात आहे. त्यामुळे नदीकाठ उघडे पडले असून नदीपात्रात अत्यल्प प्रमाणातच पाणी शिल्लक राहिले आहे. भाटा न सोडता आणि नियमांची पायमल्ली करून रेती उपसा सुरू असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या जलसंकटाचा परिणाम दुसरबीड परिसरातील अनेक ग्रामस्थांच्या बोअरवेल व विहिरींच्या पाणीपातळीवर झाला असून काही विहिरी पूर्णतः आटल्या आहेत. रेती घाट सुरू राहिल्यास मार्चअखेरीस भीषण पाणीटंचाई उद्भवण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
तत्काळ कारवाई करून हा रेती घाट बंद करण्यात यावा, अन्यथा तडेगाव फाट्यावर शेतकऱ्यांसह उपोषण करण्याचा इशारा अविनाश चव्हाण व शेख इरफान शेख समव यांनी दिला आहे.














