Advertisement Advertisement

कर्जबाजारीपणाला कंटाळून अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या; रायपूर गावावर शोककळा…..

रायपूर (बुलडाणा कव्हरेज न्युज): बुलढाणा तालुक्यातील रायपूर येथील ४३ वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्याने कर्जाच्या विवंचनेतून आपले जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (दि. ३ फेब्रुवारी) सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे रायपूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, शेतकरी कुटुंबांतील चिंता पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे.

विजय किसन मुरडकर (वय ४३) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. विजय मुरडकर यांच्याकडे अवघी दोन एकर शेती असून, त्याच शेतीवर संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून होता. शेतीमालाला अपेक्षित भाव न मिळाल्याने आर्थिक अडचणी वाढत गेल्या होत्या. त्यातच बँकेचे कर्ज फेडण्याचा ताण वाढत चालला होता.

मृतकावर सेंट्रल बँक, शाखा रायपूरचे सुमारे ५० हजार रुपयांचे कर्ज होते. कर्ज कसे फेडावे आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, या चिंतेतून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.

घटनेची माहिती मिळताच रायपूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार निलेश सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी सुभाष घेवंदे व आशिष काकडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या प्रकरणी परमेश्वर मुरडकर यांच्या फिर्यादीवरून रायपूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

विजय मुरडकर यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा आप्त परिवार आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने मुरडकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण गाव शोकमग्न झाले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!