Advertisement Advertisement

घरासमोर खेळणाऱ्या दोन वर्षांच्या चिमुरड्याला पळविण्याचा डाव! महिला घेऊन निघाली, पण शेजारणीने वेळीच रंगेहाथ पकडले; मलकापुरात खळबळ!

मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहरातील पारपेठ भागातील मुस्ताक अली नगर परिसरात घरासमोर खेळणाऱ्या अवघ्या दोन वर्षांच्या चिमुकल्याला पळवून नेण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना २१ नोव्हेंबर रोजी सायंकाळी घडली. एका महिलेने चिमुकल्याला सोबत नेण्यास सुरुवात केली; मात्र शेजारी राहणाऱ्या महिलेच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न फसला. तिने वेळीच धाव घेत संबंधित महिलेला हटकताच मोठा अनर्थ टळला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शेख सादिक शेख बशीर (रा. मुस्ताक अली नगर, पारपेठ, मलकापूर) यांचा दोन वर्षांचा मुलगा शेख नोमान हा २१ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घरासमोरील रस्त्यावर खेळत होता. याचवेळी एक अनोळखी महिला तेथे आली. तिने चिमुकल्याशी बोलत कोणालाही काहीही न सांगता त्याला सोबत घेऊन जाण्यास सुरुवात केली.

दरम्यान, घरासमोर राहणाऱ्या तानियाबी यांच्या ही बाब लक्षात आली. संशय आल्याने त्यांनी तात्काळ धाव घेत महिलेला अडवून जाब विचारला. यावेळी संबंधित महिलेने आपले नाव शबनम खानम (रा. ग्रामीण पोलीस स्टेशनसमोर, पारपेठ, मलकापूर) असे सांगितले. मात्र, विचारपूस होताच तिने तेथून पळ काढला.

या प्रकरणी शेख सादिक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मलकापूर शहर पोलिसांनी शबनम खानम हिच्याविरुद्ध अपहरणाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अप.क्र. ८९४/२०२६ नुसार कलम १३७(२), ६२ बीएनएस अंतर्गत नोंद करण्यात आली आहे. शेजारच्या महिलेने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे दोन वर्षांच्या चिमुकल्यावर आलेले संकट टळले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!