नांदुरा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शेतातील काम आटोपून बैलगाडीने घरी परतणाऱ्या ७० वर्षीय शेतकऱ्याचा भरधाव कारच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवार, ११ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजताच्या दरम्यान नांदुरा-मोताळा रोडवरील लोनवडी गावाजवळ घडली. या भीषण अपघातात बैलगाडीचा चक्काचूर झाला असून, बैलगाडीला जुंपलेले दोन्ही बैल गंभीर जखमी झाले आहेत.
वसुदेव तुळशीराम कुटे (वय अंदाजे ७० वर्षे, रा. लोनवडी) असे अपघातात मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, वसुदेव कुटे हे शेतातील काम आटोपून बैलगाडीने आपल्या घरी परतत होते. दरम्यान, नांदुरा-मोताळा मार्गावरील लोनवडीजवळ ब्रेझा कार क्रमांक एमएच ३४ बीआर ७५५५ ने त्यांच्या बैलगाडीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, या अपघातात वसुदेव कुटे यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच नांदुरा येथील ओमसाई फाउंडेशनची रुग्णवाहिका स्वयंसेवकांसह तातडीने घटनास्थळी दाखल झाली. विलास निबोळकर, बळीराम गोड, प्रमोद वरदे, संजय चोपडे, साहेबराव फासे यांच्यासह इतर स्वयंसेवकांनी तातडीने मदतकार्य केले. त्यांच्या मदतीने मृत वसुदेव कुटे यांना नांदुरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोन्ही बैलांबाबतही परिसरात चिंता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, शेतातील काम आटोपून सुखरूप घरी परतण्याच्या वाटेवर असलेल्या एका वृद्ध शेतकऱ्याचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने लोनवडी गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत असून, एका शेतकऱ्याचा संसार क्षणात उघड्यावर पडल्याची भावना ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.















