Advertisement Advertisement

वनरक्षकाची वर्दी घालण्याचं स्वप्न अधुरंच! मोकाट गायीच्या धडकेत २२ वर्षीय पवनचा दुर्दैवी अंत; आई-वडिलांच्या स्वप्नांचा चुराडा, देऊळगाव राजा शहरात हळहळ!

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : “आई, एकदा भरती झालो की तुला काही कमी पडू देणार नाही. वनरक्षकाची वर्दी घालून गावात येणार!” असे स्वप्न आईला दाखवणाऱ्या वरुड येथील पवन अंबादास इंगळे (वय २२) याचा मोकाट गायीच्या धडकेत दुर्दैवी अंत झाला. वनरक्षक होण्यासाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या पवनचे स्वप्न एका अपघाताने कायमचे हिरावून घेतले. ज्या मुलाच्या खांद्यावर वनरक्षकाची वर्दी पाहण्याची आई-वडिलांची इच्छा होती, त्याच मुलाचा फोटो आता घरात लावण्याची वेळ आल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पवन हा देऊळगाव राजा येथे शिक्षण घेत होता. वनरक्षक होण्याचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून त्याची रोजची धडपड सुरू होती. पहाटे उठून धावण्याचा सराव, दिवसभर अभ्यास आणि मैदानावर घाम गाळणे, असा त्याचा दिनक्रम होता. वनरक्षकाची वर्दी घालून जंगलाचे रक्षण करण्याचे स्वप्न त्याने उराशी बाळगले होते. मित्रांच्या म्हणण्यानुसार, पवनला जंगलाची विशेष आवड होती. वनरक्षक होण्याची त्याची जिद्द आणि मेहनत पाहून एक दिवस तो नक्की यशस्वी होईल, असा विश्वास मित्रांनाही होता.

मात्र, काळाने त्याच्यावर घाला घातला. रस्त्याने जात असताना अचानक समोर आलेल्या मोकाट गायीची धडक बसल्याने पवनचा दुर्दैवी अंत झाला. अवघ्या २२ वर्षांत त्याचा जीवनप्रवास संपला. ज्या पायांनी वनरक्षक भरतीसाठी मैदान गाजवले, ते पाय कायमचे थांबले. त्याच्या आई-वडिलांनी पाहिलेली स्वप्ने क्षणात कोसळली. पवनच्या निधनाने एका कुटुंबाचा आधारच हिरावला गेला आहे.

दरम्यान, देऊळगाव राजा शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. शहरातील रस्त्यांवर मोकाट जनावरे कधीही समोर येत असल्याने वाहनधारकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. यापूर्वीही अशा जनावरांमुळे अपघात घडून अनेकांना दुखापती झाल्याच्या घटना घडल्या आहेत. वारंवार अशा घटना घडत असतानाही नगरपालिका प्रशासनाकडून मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस उपाययोजना का केल्या जात नाहीत, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.

आज पवन गेला, उद्या कोणाचा नंबर?

पवनच्या जाण्याने त्याच्या मित्रांचा हक्काचा साथीदार हरपला, तर आई-वडिलांच्या म्हातारपणाचा आधार हिरावला गेला. त्याचे अर्धवट राहिलेले पुस्तक, रिकामे मैदान आणि वनरक्षकाच्या वर्दीचे स्वप्न आजही त्याच्या आठवणी जाग्या करीत आहे. एका तरुणाचे आयुष्य मोकाट जनावरांच्या प्रश्नामुळे संपले, ही बाब प्रशासनाने गांभीर्याने घेण्याची गरज आहे. आता तरी नगरपालिका प्रशासन जागे होणार का? आणखी किती अपघातांची वाट पाहणार? असा सवाल देऊळगाव राजा शहरातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!