Advertisement Advertisement

ऐन दिवाळीच्या दिवशी शेतकऱ्याच्या घराला भीषण आग; संसारोपयोगी साहित्य जळून खाक! अंगावरील कपड्यांशिवाय काहीच शिल्लक नाही; पीडित कुटुंबाला तातडीने शासकीय मदत देण्याची सरपंच चेतन म्हस्के यांची मागणी…

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) :अगोदरच दुष्काळाच्या संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांवर आता ऐन दिवाळीच्या सणादिवशी आणखी एक मोठे संकट कोसळले आहे. चिखली तालुक्यातील पांढरदेव येथील भानुदास एकनाथ म्हस्के यांच्या घराला अचानक भीषण आग लागून संपूर्ण संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. या दुर्दैवी घटनेमुळे मस्के कुटुंबावर मोठे संकट ओढवले असून, त्यांच्या संसाराची राखरांगोळी झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भानुदास एकनाथ म्हस्के हे बाहेरगावी गेले असताना त्यांच्या घराला अचानक आग लागली. शॉर्टसर्किट किंवा अन्य काही कारणामुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. काल रात्री सात वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केल्याने घरातील साहित्याला मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.या आगीत घरातील अन्नधान्य, कपडे आणि इतर संसारोपयोगी साहित्य जळून पूर्णपणे खाक झाले. परिस्थिती इतकी गंभीर आहे की, मस्के कुटुंबाच्या अंगावरील कपड्यांशिवाय घरात काहीही शिल्लक राहिले नसल्याचे समजते. दिवाळीच्या आनंदाच्या क्षणी या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

आधीच दुष्काळ आणि आर्थिक अडचणींमुळे शेतकरी संकटात असताना अशा प्रकारच्या दुर्घटनेमुळे कुटुंबाचा आधारच हिरावला गेला आहे. त्यामुळे प्रशासनाने या घटनेची तातडीने दखल घेऊन पंचनामा करावा आणि पीडित भानुदास म्हस्के कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत व आवश्यक जीवनावश्यक साहित्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी सरपंच चेतन म्हस्के यांनी यांनी केली आहे.

दिवाळीच्या दिवशीच संसाराची राखरांगोळी झालेल्या या कुटुंबाला प्रशासन कधी मदतीचा हात देणार, याकडे आता परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!