चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : वनविभागातील कर्मचाऱ्यांच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित करणाऱ्या दोन स्वतंत्र तक्रारी उपवनसंरक्षक, वनविभाग बुलढाणा यांच्याकडे दाखल करण्यात आल्या आहेत. अंदरवाडी बीटमध्ये कथित अवैध वृक्षतोड तसेच वनरक्षक आणि वनमजुराने धमकी देऊन ३ हजार ५०० रुपये घेतल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. मोतीसिंग परिहार आणि विशाल खिल्लारे यांनी ३० ऑक्टोबर रोजी या तक्रारी दाखल करून निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे.
मोतीसिंग परिहार (रा. अंचरवाडी, ता. चिखली) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अंचरवाडी बीटअंतर्गत वनक्षेत्रात परवानगीशिवाय झाडांची तोड करण्यात आली असून तोडलेल्या लाकडाची वाहतूक, साठवणूक किंवा विक्री झाल्याचा संशय आहे. ही वृक्षतोड वनरक्षक व वनमजुरांच्या आदेशाने, संमतीने किंवा त्यांच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागातून झाली आहे का? याची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच वनक्षेत्राची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा करावा आणि संबंधित कर्मचाऱ्यांनी पदाचा गैरवापर केला आहे का, हे तपासावे, असेही तक्रारीत नमूद आहे. यासंदर्भातील व्हिडिओ, छायाचित्रे व इतर पुरावे देण्याची तयारीही त्यांनी दर्शविली आहे.
दुसरीकडे, विशाल खिल्लारे (रा. सुलतानपूर, ता. देऊळगाव राजा) यांनी वनरक्ष व वनमजूर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. १० डिसेंबर २०२५ रोजी आपल्या गायी, म्हशी व बकऱ्या जंगलात चरत असताना संबंधित कर्मचाऱ्यांनी जनावरे अडवली. त्यावेळी अटक करण्याची आणि जनावरे जप्त करण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर वनरक्षक यांनी ३ हजार ५०० रुपयांची मागणी केली. पैसे दिल्यास जनावरे सोडून देतो, असे सांगितल्याचा आरोप खिल्लारे यांनी तक्रारीत केला आहे.
या मागणीनुसार वनमंजूर यांच्या फोन-पे खात्यावर ३ हजार ५०० रुपये पाठविण्याचा प्रयत्न केला; मात्र व्यवहार न झाल्याने नगदी रक्कम दिल्याचे खिल्लारे यांनी म्हटले आहे. या व्यवहाराचा स्क्रीनशॉट आणि हिस्ट्री आपल्याकडे असून चौकशीदरम्यान पुरावे सादर करण्यास तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. आता या दोन्ही तक्रारींमुळे वनविभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून वरिष्ठ अधिकारी या आरोपांची कितपत गांभीर्याने दखल घेतात आणि चौकशीतून काय समोर येते, याकडे लक्ष लागले आहे.
















