बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : अपुऱ्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांची अक्षरशः वाताहत झाली आहे. अनेक ठिकाणी पाण्याअभावी तूर, कपाशी आणि हळद ही पिके वाळण्याच्या मार्गावर असून, शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री तथा बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या पाठपुराव्यानंतर धरणांमधील उपलब्ध शिल्लक पाण्यातून खरीप पिकांना एक पाणी देण्याबाबत जिल्हा प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे.
अपुऱ्या पावसामुळे शेतातील उभी पिके वाळत असल्याने शेतकरी खासदार प्रतापराव जाधव यांच्याकडे आपली व्यथा मांडत होते. शेतकऱ्यांची ही अडचण लक्षात घेऊन जाधव यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाच्या बैठका घेतल्या. धरणांमधील उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेत भविष्यातील पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.
या नियोजनानुसार धरणांमधील पिण्यासाठी राखीव पाणी, बाष्पीभवन होणारे पाणी आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी १० टक्के अतिरिक्त पाणीसाठा सुरक्षित ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर उर्वरित शिल्लक पाण्यातून शेतकऱ्यांच्या पिकांना पाणी देण्याची व्यवस्था करण्याची चाचपणी करण्यात आली. प्रशासनाने सर्वेक्षण करून त्यानुसार सूक्ष्म नियोजन केले असून, आता टप्प्याटप्प्याने तूर, कपाशी, हळद तसेच जनावरांच्या चाऱ्यासाठी पाणी सोडण्याबाबत सकारात्मकता दर्शवली आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होणारे हे पाणी अत्यंत काटकसरीने वापरावे, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले आहे. हे पाणी केवळ सध्याच्या खरीप पिकांना दिलासा देण्यासाठी असून, त्याचा वापर रब्बी पिकांसाठी करू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे पावसाच्या दडीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आता धरणातील शिल्लक पाण्याचा आधार मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.















