Advertisement Advertisement

शेतकऱ्याच्या शेतातील सोलर प्लेट चोरीला! विहिरीवरील सोलर यंत्रणा गायब; शेतकऱ्याचे नुकसान, अंढेरा पोलिसांत तक्रार….

अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्युज): शेतात पिकांना पाणी देण्यासाठी विहिरीवर बसविण्यात आलेल्या सोलर पॅनेलवरच अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना मेरा बु. येथील मनुबाई शेतशिवारात उघडकीस आली. २६ ऑक्टोबर रोजी हा प्रकार समोर आला असून, या चोरीमुळे शेतकऱ्याचे अंदाजे ५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी अंढेरा पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मेरा बु. येथील शेतकरी दत्तात्रय पडघान (वय ७१) यांची मनुबाई शेतशिवारातील गट क्रमांक ३४ मध्ये एक हेक्टर १२ आर शेती आहे. शेतातील विहिरीवर पिकांना पाणी देण्यासाठी त्यांनी सोलर पॅनेल बसविले आहे. २५ ऑक्टोबर रोजी त्यांनी आपल्या शेतात करडीची पेरणी केली होती.

२६ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास पडघान हे करडीच्या पिकाला पाणी देण्यासाठी शेतात गेले होते. त्यांनी सोलर यंत्रणेच्या मदतीने मोटारपंप सुरू केला. त्यानंतर सकाळी ११ वाजताच्या सुमारास ते जेवणासाठी घरी गेले. दरम्यान, दुपारी एकच्या सुमारास शेजारील शेतकरी दिनकर पुंजाजी वायाळ यांनी फोन करून सोलर यंत्रणा बंद पडल्याची माहिती दिली.

माहिती मिळताच पडघान यांनी शेतात जाऊन पाहणी केली असता मोटारपंप बंद असल्याचे दिसून आले. सोलर यंत्रणेची तपासणी केली असता अज्ञात व्यक्तीने सोलर पॅनेल चोरून नेल्याचे त्यांच्या लक्षात आले. या घटनेत अंदाजे पाच हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

याप्रकरणी दत्तात्रय पडघान यांनी २६ ऑक्टोबर रोजी अंढेरा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. शेतातील सोलर पॅनेल चोरणाऱ्या अज्ञात चोरट्यांचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. आता पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास कसा करतात, याकडे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!