Advertisement Advertisement

शेतकऱ्यांनो, आभाळाकडं लक्ष ठेवा! बुलढाणा जिल्ह्यात दोन दिवस पावसाचा अंदाज! कधी ऊन तर कधी ढगाळ वातावरण! शेतमाल उघड्यावर ठेवाल तर नुकसान होऊ शकतं! कृषी विज्ञान केंद्राचा शेतकऱ्यांना सल्ला!

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : भारतीय हवामान विभागाने वर्तविलेल्या पाच दिवसीय हवामान अंदाजानुसार, ‘अर्णब’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे बुलढाणा जिल्ह्यात २८ आणि २९ ऑक्टोबर रोजी तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर ३० आणि ३१ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. या काळात काही ठिकाणी आकाश निरभ्र ते अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता असून, बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

हलक्या पावसाची शक्यता लक्षात घेता, शेतकऱ्यांनी काढणी केलेला शेतमाल सुरक्षित आणि कोरड्या ठिकाणी साठवून ठेवावा. पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शेतीतील कामांचे नियोजन हवामानाच्या अंदाजानुसार करावे, असे आवाहन ग्रामीण कृषी मौसम सेवा, जिल्हा कृषी हवामान केंद्र आणि कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा यांच्या वतीने करण्यात आले आहे.

दरम्यान, करडीची पेरणी ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत करता येणार आहे. पेरणीपूर्वी करडीचे बियाणे रात्रभर पाण्यात भिजवून घेतल्यास त्याची उगवण लवकर आणि चांगली होण्यास मदत होते. रब्बी पिकांची पेरणी करताना लवकर परिपक्व होणाऱ्या आणि पाण्याचा ताण सहन करू शकणाऱ्या वाणांची निवड करावी. तसेच, एल निनो सदृश परिस्थिती लक्षात घेता, फळझाडांवरील सुकलेल्या, रोगट आणि अतिरिक्त फांद्या काढून टाकाव्यात. यामुळे उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करता येईल.

शेतीसोबतच पशुधनाची काळजी घेणेही आवश्यक आहे. जनावरांना केवळ वाळलेला चारा दिल्यास त्यांच्या पोषणविषयक सर्व गरजा पूर्ण होत नाहीत. त्यामुळे जनावरांचे वय, वजन, दूध उत्पादन आणि शारीरिक अवस्था लक्षात घेऊन त्यांच्या आहाराचे नियोजन करावे. आवश्यकतेनुसार संतुलित पशुखाद्य, खनिज मिश्रण आणि मीठ द्यावे, असे कृषी विज्ञान केंद्राने सुचविले आहे.

हवामानातील संभाव्य बदल लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी पिके, काढणी केलेला शेतमाल आणि पशुधनाची योग्य काळजी घ्यावी. तसेच, हवामानाच्या अंदाजानुसार शेतीविषयक कामांचे नियोजन करून संभाव्य नुकसान टाळण्यासाठी खबरदारी घ्यावी, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे. (जिमाका)

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!