लोणार (बुलडाणा कव्हरेज न्युज): लोणार तालुक्यातील सावरगाव मुंढे येथील पूजा समाधान राठोड (वय २२) ही १ सप्टेंबरच्या मध्यरात्रीनंतर घरातून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. घरातील ७० हजार रुपये रोख तसेच लहान मुलीचे दागिने सोबत घेऊन गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेनंतर कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला; मात्र ती आढळून न आल्याने पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पूजा राठोड ही १ सप्टेंबरच्या मध्यरात्रीनंतर घरातून निघून गेली. सकाळी ती घरात नसल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले. घरातील रोख रक्कम आणि लहान मुलीचे दागिनेही सोबत नसल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर नातेवाईक तसेच परिचितांकडे तिचा शोध घेण्यात आला; मात्र तिच्याबाबत काहीही माहिती मिळाली नाही.
पूजा राठोडचे वर्णन: तिचा रंग गोरा असून उंची अंदाजे ५ फूट आहे. बांधा सडपातळ असून बेपत्ता होताना तिच्या अंगावर हिरव्या रंगाचा ड्रेस असल्याचे तक्रारीत नमूद आहे. ती मराठी, हिंदी आणि बंजारा भाषा बोलते.
या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून पूजाचा शोध सुरू आहे. तिच्याबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास तातडीने जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.














