मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : बहिणीच्या घरी भेटीसाठी आलेल्या महिलेबाबत तिच्या मेहुण्यानेच अश्लील वर्तन केल्याची संतापजनक घटना मोताळा तालुक्यातील माळेगाव येथे समोर आली आहे. या प्रकरणी संबंधित महिलेच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ६४(१) आणि ७५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला मुंबई येथील असून ती आपल्या बहिणीच्या भेटीसाठी माळेगाव येथे आली होती. ८ ऑगस्टच्या रात्री ती बहिणीच्या घरी झोपलेली असताना तिच्या बहिणीचा पती रतन अशोक इंगळे याने तिच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप महिलेने तक्रारीत केला आहे.
या प्रकारानंतर पीडित महिलेने विक्रोळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार सुरुवातीला विक्रोळी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तो मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्याकडे वर्ग केला. मात्र, घटनास्थळ मलकापूर ग्रामीणऐवजी धामणगाव बढे पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने पुढील कारवाईसाठी सदर गुन्हा धामणगाव बढे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
या घटनेमुळे नातेसंबंधांमध्ये विश्वासाला तडा देणाऱ्या या प्रकाराबाबत परिसरात संताप व्यक्त होत आहे. प्रकरणाचा पुढील तपास धामणगाव बढे पोलीस ठाण्याचे ठाणेदार निखिल निर्मळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
















