बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : सत्ता असो किंवा नसो, संघटनात्मक ताकद आणि सोहळ्यांची परंपरा जिवंत ठेवणारा पक्ष म्हणून काँग्रेसची ओळख आजही कायम आहे. मात्र दिल्लीपासून गल्लीपर्यंत पक्षाची झालेली पडझड लपून राहिलेली नाही. महाराष्ट्र विधानसभेत अवघे १६ आमदार, बुलढाणा जिल्ह्यात शून्य आमदार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील घटलेले अस्तित्व या पार्श्वभूमीवर काँग्रेसने संघटना मजबूत करण्यासाठी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी जळगाव जामोदचे प्रकाश पाटील अवचार यांच्या खांद्यावर सोपविली आहे.
बुलढाणा जिल्हा काँग्रेसचा इतिहास मोठा आहे.
गोविंदसेठ भाटिया, जनार्धन बोंद्रे, अॅड. गणेशराव पाटील, श्यामबाबू उमाळकर, विजय अंभोरे आणि राहुल बोंद्रे यांच्यानंतर आता प्रकाश पाटील यांच्या हाती जिल्हाध्यक्षपदाची धुरा आली आहे. विशेष म्हणजे या पदासाठी अनेक इच्छुक मैदानात होते. संघटन सृजन अभियानांतर्गत अनेकांनी प्रयत्न केले, तर काहींनी जिल्हाभर संपर्क मोहिमाही राबविली. मात्र अखेर पक्षश्रेष्ठींनी प्रकाश पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
२०१९ पर्यंत राहुल बोंद्रे आमदार असताना जिल्ह्यातील काँग्रेसचे चित्र काहीसे वेगळे होते. मात्र त्यानंतर पक्षातील अनेक कार्यकर्ते आणि नेते इतर पक्षांच्या वाटेने गेल्याने संघटना कमकुवत होत गेली. अनेक ठिकाणी काँग्रेसची पकड सैल झाली, तर काही पारंपरिक बालेकिल्लेही हातातून निसटले. त्यामुळे नव्या जिल्हाध्यक्षांसमोर संघटना पुन्हा उभी करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
प्रकाश पाटील हे स्वभावाने संयमी आणि कार्यकर्त्यांशी जोडलेले नेते म्हणून ओळखले जातात. मात्र सध्याचा राजकीय काळ केवळ माणुसकीचा नसून संघर्षाचा आहे. कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणे, नाराज गटांना एकत्र आणणे आणि रस्त्यावर उतरून आंदोलनात्मक भूमिका घेणे ही जबाबदारी त्यांच्यावर असेल. जिल्हाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांनी आंदोलनात्मक भूमिकेची दिलेली चिन्हे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करणारी ठरत आहेत.
दरम्यान, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाची खरी परीक्षा ठरणार आहेत. तिकीट वाटपापासून ते संघटना विस्तारापर्यंत अनेक कठीण निर्णय त्यांना घ्यावे लागणार आहेत. आधीच उजाड झालेल्या काँग्रेसच्या अंगणात नव्या नेतृत्वाचा प्रकाश किती पडतो आणि कार्यकर्त्यांच्या मनात नवी उमेद निर्माण होते का, याकडे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.















