Advertisement Advertisement

जनता दरबारातील तक्रारींचा आ.श्वेता ताई महाले  यांचा आढावा; “जनता दरबारातच धडाधड निकाल; अधिकाऱ्यांना दिले कडक आदेश…

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज): चिखली विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या विविध समस्या आणि तक्रारींचे प्रभावी निवारण व्हावे, या उद्देशाने आयोजित करण्यात येणाऱ्या जनता दरबारात प्राप्त झालेल्या प्रकरणांचा आढावा घेण्यासाठी आमदार श्वेता महाले पाटील यांनी गुरुवारी विशेष बैठक घेतली. विशेष म्हणजे या आढावा बैठकीलाच जनता दरबाराचे स्वरूप प्राप्त झाले असून मोठ्या संख्येने शेतकरी, नागरिक आणि तक्रारदार उपस्थित होते.

बैठकीत जनता दरबारात प्राप्त झालेल्या तक्रारींची सद्यस्थिती, त्यावरील कार्यवाही तसेच प्रलंबित प्रकरणांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. गावागावांतून आलेल्या शेतकरी व नागरिकांच्या समस्या संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसमोर मांडण्यात आल्या. तक्रारदार आणि अधिकारी यांच्यात समन्वय साधून अनेक प्रश्नांवर तत्काळ तोडगा काढण्यावर भर देण्यात आला.

या बैठकीस तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, महसूल विभागातील तलाठी तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. महसूल, ग्रामविकास, नगरपरिषद आणि इतर विभागांशी संबंधित अनेक तक्रारींवर चर्चा करून संबंधित अधिकाऱ्यांना वेळेत कार्यवाही करण्याच्या स्पष्ट सूचना आमदार महाले पाटील यांनी दिल्या. काही तक्रारींचे निवारण बैठकीदरम्यानच करण्यात आले, तर उर्वरित प्रकरणे निश्चित कालमर्यादेत निकाली काढण्याचे निर्देश देण्यात आले.

यावेळी उपस्थित नागरिकांनी आमदार श्वेता महाले पाटील यांच्या लोकाभिमुख कार्यपद्धतीचे कौतुक करत समाधान व्यक्त केले.

यावेळी बोलताना आमदार श्वेता महाले पाटील म्हणाल्या, “जनता दरबार हा केवळ तक्रारी स्वीकारण्याचा उपक्रम नसून प्रत्येक तक्रारीचा पाठपुरावा करून नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे प्रभावी माध्यम आहे. लोकांच्या समस्या वेळेत सुटाव्यात, यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात प्रभावी समन्वय आवश्यक आहे. नियमित जनता दरबारामुळे नागरिकांना आपल्या समस्या थेट प्रशासन आणि लोकप्रतिनिधींपर्यंत मांडण्याची संधी मिळत असून अनेक प्रश्नांना तातडीने न्याय मिळत आहे.”

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!