जळगाव जामोद (बुलडाणा कव्हरेज न्युज) : अल्पवयीन मुलीला वारंवार फोन करून प्रेमाची मागणी करत त्रास देण्याचा प्रकार जळगाव जामोद तालुक्यातील वडशिंगी येथे उघडकीस आला आहे. भेटायला आली नाहीस तर स्वतःच्या जीवाचे बरेवाईट करण्याची धमकी दिल्याचा आरोप असून, या प्रकरणी मलकापूर येथील अजिक्य सुरेश तायडे याच्याविरुद्ध जळगाव जामोद पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी महिलेच्या नातेवाईकांपैकी आहे. त्याने संबंधित १७ वर्षीय मुलीला वारंवार फोन करून प्रेमाची मागणी केली. तसेच भेटण्यासाठी येण्याचा आग्रह धरला. भेटायला न आल्यास स्वतःच्या जीवाचे बरेवाईट करण्याची धमकीही दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
सततच्या फोनमुळे त्रस्त झालेल्या मुलीने हा प्रकार आईला सांगितला. त्यानंतर आईने जळगाव जामोद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी १४ नोव्हेंबर रोजी अजिक्य तायडे याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ७८, ३५१(२) तसेच पोक्सो कायद्याच्या कलम १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास जळगाव जामोद पोलीस करीत आहेत.













