Advertisement Advertisement

बाळ अर्धं बाहेर, अर्धं आत अन् आई रस्त्यावर तडफडत होती! दवाखाना फक्त ५० मीटरवर, तरी मदतीला कोणी धावलं नाय; मेहकरात संताप!

मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज): केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या मेहकर शहरातच सरकारी आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. ग्रामीण रुग्णालयापासून अवघ्या ५० मीटर अंतरावर प्रसूतीच्या वेदनांनी विव्हळणाऱ्या महिलेची चक्क रस्त्यालगतच्या ओट्यावर प्रसूती झाल्याची घटना घडली. विशेष म्हणजे, महिलेची प्रकृती गंभीर असल्याचे सांगूनही रुग्णालयातील स्टाफ नर्सने घटनास्थळी येण्यास नकार दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

घरातून रुग्णालयाकडे निघाली अन् ओट्यावरच कोसळली

मिळालेल्या माहितीनुसार, बालाजी अर्बनचे अध्यक्ष योगेश सौभागे यांच्या शेजारी राहणाऱ्या पिसे परिवारातील महिलेला सकाळी सुमारे सहा वाजेच्या दरम्यान अचानक प्रसूतीवेदना सुरू झाल्या. घरी मदतीसाठी कोणी नसल्याने ती महिला स्वतःच चालत ग्रामीण रुग्णालयाच्या दिशेने निघाली. मात्र, रुग्णालय गाठण्यापूर्वीच ती रस्त्यालगतच्या एका ओट्यावर कोसळली.

यावेळी बाळाचा काही भाग बाहेर आला होता, तर काही भाग आत अडकलेला असल्याने परिस्थिती अत्यंत गंभीर बनली. महिलेच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचे लक्षात येताच योगेश सौभागे यांनी तातडीने ग्रामीण रुग्णालय गाठले.

‘डॉक्टर नाहीत, मी एकटीच आहे’; नर्सने मदतीस नकार दिल्याचा दावा

सौभागे यांनी रुग्णालयातील स्टाफ नर्सकडे घटनास्थळी येऊन महिलेची मदत करण्याची विनंती केल्याचा दावा केला आहे. मात्र, ‘रुग्णालयात डॉक्टर नाहीत, मी एकटीच आहे; बाहेर येऊ शकत नाही,’ असे उत्तर देत नर्सने घटनास्थळी येण्यास नकार दिल्याचे त्यांनी सांगितले.

महिलेची परिस्थिती गंभीर असल्याचे वारंवार सांगूनही तातडीची वैद्यकीय मदत मिळाली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

अखेर खासगी नर्सच्या मदतीने रस्त्यावरच प्रसूती

सरकारी रुग्णालयाकडून तातडीची मदत मिळत नसल्याने अखेर सौभागे यांनी एका खासगी रुग्णालयातील नर्सला घटनास्थळी बोलावले. सौभागे परिवारातील महिलांच्या सहकार्याने रस्त्यालगतच्या ओट्यावरच महिलेची प्रसूती करण्यात आली. त्यानंतर माता आणि नवजात बाळाला पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

नाईट ड्युटीवरील डॉक्टर होते कुठे?

या घटनेनंतर मेहकरच्या ग्रामीण रुग्णालयातील आपत्कालीन आरोग्यसेवेबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. नाईट ड्युटीवर असलेले डॉक्टर नेमके कुठे होते? आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालयातील कर्मचारी घटनास्थळी का पोहोचले नाहीत? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या शहरातच सरकारी आरोग्य व्यवस्थेची अशी अवस्था समोर आल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या संपूर्ण घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

दरम्यान, या प्रकरणात ग्रामीण रुग्णालय प्रशासनाची अधिकृत बाजू अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे संबंधित प्रशासनाचे म्हणणे समोर आल्यानंतरच घटनेची संपूर्ण वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!