Advertisement Advertisement

आंदोलनकर्त्यांच्या पाठीशी सरकार ठाम उभे – आ.श्वेता ताई महाले पाटील…! संगणक परिचालक व ग्रामरोजगार सेवकांच्या प्रश्नांवर सभागृहात आवाज उठवणार….

बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): राज्यातील संगणक परिचालक तसेच ग्राम रोजगार सेवकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आझाद मैदान, मुंबई येथे सुरू असलेल्या आंदोलनाला चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांनी भेट देत आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेत शासन स्तरावर सकारात्मक पाठपुरावा करून न्याय देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.

यावेळी आमदार महाले यांनी संगणक परिचालकांच्या मानधनवाढ, सेवा सुरक्षा, कर्मचारी दर्जा आणि नियमित वेतन या प्रमुख मागण्यांची सविस्तर माहिती घेतली. ग्रामपंचायत स्तरावर नागरिकांना विविध शासकीय सेवा देण्यात संगणक परिचालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून त्यांच्या न्याय्य मागण्यांबाबत शासनाने संवेदनशीलतेने निर्णय घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत कार्यरत ग्राम रोजगार सेवकांच्या आंदोलनालाही त्यांनी भेट दिली. ग्राम रोजगार सेवकांनी मानधन वाढ, प्रवास भत्ता, सेवेला स्थैर्य तसेच शासन निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी या प्रमुख मागण्या मांडल्या.

या संदर्भात येत्या २६ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र विधानसभेत अर्धा तास चर्चा घेऊन संगणक परिचालक व ग्राम रोजगार सेवकांच्या प्रश्नांवर ठोस भूमिका मांडणार असल्याचे आमदार श्वेता महाले पाटील यांनी स्पष्ट केले. राज्याच्या ग्रामीण विकास व्यवस्थेत या दोन्ही घटकांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असून त्यांच्या मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार महाले यांच्या भेटीमुळे आंदोलनकर्त्यांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या न्याय्य मागण्यांना लवकरच न्याय मिळेल, अशी अपेक्षा आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!