Advertisement Advertisement

चांडोळमध्ये आवारा कुत्र्यांचा हैदोस; एका कुत्र्याने १३ जणांना चावा घेतल्याने परिसरात वातावरण ….

चांडोळ (बुलडाणा कव्हरेज न्युज) : बुलढाणा तालुक्यातील चांडोळ गावात गेल्या काही महिन्यांपासून आवारा कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, गावातील विविध भागांत कुत्र्यांचे कळप मुक्तपणे फिरताना दिसत आहेत. मुख्य रस्ते, शाळा परिसर, अंगणवाडी, बाजारपेठ, बसस्थानक तसेच वस्ती भागात दिवसरात्र कुत्र्यांचा वावर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

विशेषतः लहान मुले, शालेय विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना या समस्येचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर अचानक कुत्रे आल्याने दुचाकीस्वारांसह इतर वाहनचालकांना अचानक ब्रेक लावावे लागत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. त्यातच एका कुत्र्याने तब्बल १३ नागरिकांना चावा घेतल्याची घटना समोर आल्याने ग्रामस्थांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे.

शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही गंभीर बनला आहे. पालकांकडून मुलांना शाळेत पाठवताना चिंता व्यक्त केली जात असून, प्रशासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

निर्बीजीकरण व लसीकरणाची मागणी….

आवारा कुत्र्यांची वाढती संख्या नियंत्रित करण्यासाठी ग्रामपंचायत व संबंधित प्रशासनाने नियमानुसार कुत्र्यांची मोजणी करून निर्बीजीकरण आणि लसीकरणाची मोहीम राबवावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच शाळा, अंगणवाडी, बाजारपेठ आणि बसस्थानक परिसरात नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

“चांडोळ गावात आवारा कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. एका कुत्र्याने १३ नागरिकांना चावा घेतल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ग्रामपंचायतीने तातडीने उपाययोजना करून आवारा कुत्र्यांची संख्या नियंत्रित करावी आणि नागरिकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावे,” अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!