मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज): भरधाव वेगाने येणाऱ्या बोलेरो मालवाहू पिकअपने प्रथम दुचाकीला आणि त्यानंतर बैलगाडीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर बैलगाडीतील ५५ वर्षीय इसम गंभीर जखमी होऊन त्यांचा डावा पाय निकामी झाला. ही भीषण घटना १ जुलै रोजी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास मलकापूर-बोदवड रोडवरील टॉवर परिसरात घडली. या अपघातात बैलगाडीला जुंपलेला एक बैलही ठार झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, जांबुळधाबा येथील गजानन बाबुराव जवरे (वय ४४) हे त्यांच्या प्लॅटिना दुचाकी (क्र. एमएच २८ बीएफ ६११०) वरून मलकापूरहून जांबुळधाबाकडे जात होते. त्यावेळी मागून भरधाव वेगाने आलेल्या बोलेरो मालवाहू पिकअप (क्र. एमएच २८ बीबी ९३४१) ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत गजानन जवरे यांचा जागीच मृत्यू झाला.
दुचाकीला धडक दिल्यानंतरही बोलेरो चालकाने वाहनावरील नियंत्रण गमावले आणि काही अंतर पुढे जाऊन रस्त्यावरून जात असलेल्या बैलगाडीलाही जोरदार धडक दिली. या धडकेत जांबुळधाबा येथील धनराज माणिकराव बावस्कर (वय ५५) गंभीर जखमी झाले. त्यांच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत होऊन तो गुडघ्यापासून निकामी झाल्याचे सांगण्यात आले असून त्यांच्यावर शहरातील कोलते हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तसेच बैलगाडीला जुंपलेला एक बैलही या अपघातात दगावला.
याप्रकरणी मधुसुदन पंजाबराव जवरे, रा. जांबुळधाबा यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी बोलेरो चालक शुभम दिनकर राणे (रा. हरणखेड, ता. मलकापूर) याच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक ४८७/२०२६ नोंदविला आहे. त्याच्यावर भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत कलम २८१, १२५(अ), १२५(ब), १०६(१), ३२४(६) तसेच भारतीय मोटार वाहन कायद्यातील कलम १८४ व १८७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पीएसआय सुरेश रोकडे करीत आहेत.














