Advertisement Advertisement

चांडोळच्या मातीत सापडला पुरातन जैन वारसा; आता तरी सरकारनं डोळे उघडावेत! ९००-११०० वर्षांच्या मूर्तींचे जतन करा, जैन समाजाची प्रशासनाकडे आर्त मागणी!

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): बुलढाणा तालुक्यातील चांडोळ येथे पुरातन काळातील जैन तीर्थंकरांच्या मूर्ती तसेच मंदिराचे अवशेष आढळून आले आहेत. मात्र, ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेल्या या मूर्ती सध्या भग्नावस्थेत व दुर्लक्षित स्थितीत पडून असल्याचे समोर आले आहे. या प्राचीन वारशाचे तातडीने जतन व संवर्धन करून मूर्ती सुरक्षित ठिकाणी हलवाव्यात, अशी मागणी अखिल दिगंबर जैन सैतवाल संस्था, बुलडाणा जिल्ह्याच्या वतीने करण्यात आली आहे.

याबाबत जिल्हाधिकारी, तहसीलदार तसेच पुरातत्त्व विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनानुसार, मौजे चांडोळ येथील नृसिंह व विठ्ठल-रुक्माई संस्थान मंदिर परिसरात प्राचीन जैन तीर्थंकरांच्या मूर्ती आणि मंदिराचे अवशेष आढळून आले आहेत. यामध्ये एक मूर्ती कायोत्सर्ग अर्थात खड्गासन मुद्रेत उभी असून, दोन मूर्ती पद्मासन ध्यानमुद्रेत बसलेल्या आहेत. याशिवाय मंदिराचे स्तंभ, शिखराचे तुकडे तसेच नक्षीकाम केलेले दगडही परिसरात आढळले आहेत.

या मूर्ती काळ्या बेसॉल्ट दगडातील असून, त्यांचा कालखंड साधारणतः इ.स. १०व्या ते १२व्या शतकातील असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यादवकालीन हेमाडपंथी स्थापत्यशैलीशी या अवशेषांचा संबंध असल्याचेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे या मूर्ती व अवशेषांना सुमारे ९०० ते ११०० वर्षांचा ऐतिहासिक वारसा असल्याचा दावा निवेदनातून करण्यात आला आहे. मात्र, सध्या या मौल्यवान मूर्ती मंदिर परिसरात असुरक्षित अवस्थेत असल्याने त्यांची नासधूस किंवा चोरी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

पुरातत्त्व विभागाने तातडीने पाहणी करावी….

चांडोळ येथील या प्राचीन जैन मूर्ती व मंदिराच्या अवशेषांचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने पंचनामा करावा, तसेच मूर्ती सुरक्षित व संरक्षित ठिकाणी हलवाव्यात, अशी मागणी जैन समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (ASI), नागपूर मंडळ तसेच महाराष्ट्र पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी करून या ठिकाणाचे शास्त्रोक्त पद्धतीने जतन व संवर्धन करावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.

तसेच चांडोळ येथील या जागेला प्राचीन स्मारक म्हणून संरक्षित घोषित करून त्याचे संवर्धन करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. या संदर्भातील जीपीएस छायाचित्रे आणि पीडीएफ स्वरूपातील कागदपत्रेही संबंधित प्रशासनाकडे सादर करण्यात आली आहेत. त्यामुळे आता प्रशासन व पुरातत्त्व विभाग या ऐतिहासिक वारशाच्या संवर्धनासाठी काय पावले उचलते, याकडे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!