गौरीपूजनाच्या दिवशीच माय-लेकावर काळाचा घाला; भरधाव कंटेनरच्या धडकेत दोघांचा दुर्दैवी मृत्यू…..
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): घरात अवघ्या काही वेळात गौरीपूजनाचा मंगलमय सोहळा सुरू होणार होता. सणाच्या उत्साहात कुटुंब आनंदाची तयारी करीत असतानाच काळाने या कुटुंबावर घाला घातला. बुलढाणा-धाड मार्गावर शिवसाई नगरजवळ भरधाव कंटेनरने दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत आई आणि मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. शुक्रवार, १८ सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास ही हृदयद्रावक घटना घडली.
माहोरा (कोल्हापूर), ता. जाफ्राबाद येथील अंकुश रामदास जाधव (वय २७) आणि त्यांची आई आनंदाबाई जाधव (वय ६५) हे दोघे एमएच २१ बीबी २८४२ क्रमांकाच्या दुचाकीने बुलढाण्याकडून आपल्या घराकडे जात होते. दरम्यान, शिवसाई नगरजवळ समोरून येणाऱ्या एमएच २० जीझेड ७६५८ क्रमांकाच्या भरधाव कंटेनरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
धडक एवढी भीषण होती की, आनंदाबाई जाधव यांचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या अंकुश जाधव यांना तातडीने रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयाकडे नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. अवघ्या काही मिनिटांवर आलेला गौरीपूजनाचा सण या कुटुंबासाठी क्षणात दुःखाच्या डोंगरात बदलला.
अपघातानंतर कंटेनर चालकाला पकडले…..
अपघातानंतर कंटेनर चालकाने घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. मात्र, संतप्त स्थानिकांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.
गौरीपूजनाच्या मंगलमय पर्वावरच एकाच कुटुंबातील आई आणि मुलाचा असा करुण अंत झाल्याने माहोरा परिसरासह संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.














