Advertisement Advertisement

दुचाकीला धडक देऊन पळणारी कार विहिरीत कोसळली; दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू, चालक गंभीर….

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : दुचाकीला धडक दिल्यानंतर घटनास्थळावरून भरधाव वेगाने पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेली कार रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळल्याची थरारक घटना जालना जिल्ह्यातील पारध ते वालसावंगी मार्गावरील पद्मावती गावाजवळ घडली. या भीषण अपघातात कारमधील दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, चालक गंभीर जखमी झाला आहे. जखमी चालकावर बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, धावडा गावातील एका कुटुंबातील आई, मुलगा आणि आजी हे पारधजवळील सावंगी अवघडराव येथे अंत्यविधीसाठी गेले होते. अंत्यविधी आटोपून परतत असताना पद्मावती गावाजवळ त्यांच्या कारची एका दुचाकीला धडक झाली.

दुचाकीला धडक दिल्यानंतर कार चालकाने तेथून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, कार भरधाव वेगात असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत जाऊन कोसळली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

अंधारामुळे बचावकार्यात अडथळे….

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांसह बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. विहिरीत कार अडकल्याने त्यातील वृद्ध महिलेला बाहेर काढण्यासाठी रात्री उशिरापर्यंत प्रयत्न सुरू होते. मात्र, अंधारामुळे बचावकार्य करताना मोठ्या अडचणी निर्माण झाल्या. दरम्यान, कारमधील वृद्ध महिलेचा मृत्यू झाला.

या अपघातात चालक आणि त्याची आई हे दोघेही गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने बुलढाणा येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, चालकाच्या आईची प्रकृती चिंताजनक असल्याने उपचारादरम्यान तिचाही मृत्यू झाला.

चालकावर सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, पुढील तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!