चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): राज्य शासनाच्या दोन लाख रुपयांपर्यंतच्या शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत होत असलेल्या तफावतीमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढत आहे. कर्जमाफी यादीतील रक्कम, बँकेच्या मुद्दलाची रक्कम आणि KYC नंतर दिसणारी थकबाकी यामध्ये मोठा फरक दिसून येत असल्याचा आरोप क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक यांच्यासह शेतकऱ्यांनी केला होता.या प्रकरणी शेलसुर येथील स्टेट बँकेत सरनाईक व राजपुत यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी ठिय्या देत आंदोलन केले होते.तेव्हा सिबील खराब होऊन पिक कर्जा वेतीरीक्त गृह व शैक्षणीक लोणला अडचणी निर्माण होणार असल्याचा मुद्दा पुढे आला होता.भविष्यातील अडचणीची जबाबदारी शासनाने घ्यावी याबाबत बॅकांनी वरीष्ठांना मार्गदर्शन मागवावे अशी मागणी केली होती.हा मुद्दा चांगलाच गाजल्याने या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते विनायक सरनाईक आणि नितीन राजपूत यांनी उपस्थित केलेल्या मागणीची दखल घेत आमदार सौ.श्वेता महाले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन याबाबत उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.यावर मुख्यमंत्री यांनी सहकार सचिव विभागाला उपाययोजना करण्यासाठी निर्देश दिले आहेत.
३ ऑगस्ट २०२६ रोजी शेतकऱ्यांसह शेलसूर येथील स्टेट बँक शाखा व्यवस्थापकांना घेराव घालून कर्जमाफीतील तफावतीबाबत जाब विचारण्यात आला होता. तसेच चिखली तालुक्यातील विविध बँकांमध्ये जाऊनही संबंधित अधिकाऱ्यांकडे या संदर्भात स्पष्टीकरण मागण्यात आले होते.
शेतकऱ्यांच्या आलेल्या अडचणी मुळे दोन लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या किंवा कर्जमाफीचा तफावत असलेल्या कर्जदारांची अतिरिक्त रक्कम बँकांकडून OTS (वन टाईम सेटलमेंट) अथवा ‘हेअरकट’ पद्धतीने समायोजित केली जात आहे.याबाबत तफावतीची उर्वरीत रक्कम बॅका जरी भरणार असल्या तरी ही रक्कम ots माध्यमातून भरली जाणार असल्याने यामुळे संबंधित शेतकऱ्यांचा CIBIL स्कोर खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शेतकरी नेते विनायक सरनाईक आणि नितीन राजपूत यांनी, “CIBIL स्कोर खराब झाल्यास भविष्यात पीक कर्ज, शिक्षण कर्ज किंवा गृहकर्ज मिळण्यात अडचणी निर्माण होतील. मग ही कर्जमाफी की शेतकऱ्यांची फसवणूक?” असा सवाल उपस्थित केला होता.तसेच कर्जमाफीतील तफावतीची यादी जाहीर करावी आणि CIBIL स्कोरवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही, याची शासनाने लेखी हमी द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.या प्रकरणी जिल्हाधिकारी, जिल्हा उपनिबंधक, तहसिलदार यांच्याकडे सुद्धा या प्रकरणी मुद्दे उपस्थित करण्यात आले होते.या प्रकरणी चिखली तहसिल कार्यालयात तालुक्यातील बॅकांचे अधिकारी यांची बैठक घेऊन यावर कार्यवाही करण्याच्या अनुषंगाने मुद्दे उपस्थित करण्यात आले होते.
मुख्यमंत्रींकडे आमदार महालेंची मागणी….
या आंदोलनानंतर आणि तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागणी नंतर शेतकरी हिताच्या दृष्टीने आमदार श्वेता महाले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. निवेदनात दोन लाख रुपयांपेक्षा अधिक कर्जाची परतफेड OTS किंवा हेअरकट पद्धतीने न करता नियमित पद्धतीने करण्यात यावी, तसेच कर्जमाफीच्या प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांचा CIBIL स्कोर खराब होणार नाही, यासाठी आवश्यक धोरणात्मक उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली.आमदारांनी हा मुद्दा थेट मुख्यमंत्री यांच्याकडे मांडला असल्याने भविष्यात शेतकऱ्यांना न्याय मिळणार असल्याने विनायक सरनाईक यांच्या पाठपुराव्यास यश आले असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
या विषयाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री यांनी संबंधित प्रकरणात सहकार मंत्र्यांना आवश्यक निर्देश दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आगामी काळात शासनाकडून सकारात्मक निर्णय होऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.या शेतकरी हिताच्या मागणीनंतर शेतकऱ्यांकडून आमदार महाले यांचे अभिनंदन होत आहे.तर क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक यांनी सुद्धा फेसबुक पेजवर शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेतल्याने आमदार महोदय यांचे आभार मानले आहे.
दरम्यान, शासनाच्या पुढील आदेशानंतर बँका या संदर्भात कोणती भूमिका घेतात, याकडे राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.














