Advertisement Advertisement

कोराडी प्रकल्प परिसरातील जीवघेण्या खड्ड्यात दोन बालकांचा बुडून मृत्यू! पाय धुण्यासाठी पाण्यात उतरले अन् खोल पाण्यात ओढले गेले; कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची ग्रामस्थांची मागणी….

डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : कोराडी मध्यम प्रकल्पाच्या परिसरात पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून दोन मावस भावांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. आयान राजू शेख (वय १०, रा. देऊळगाव माळी) आणि आवेद इब्राहिम शेख (वय ११, रा. लोणार) अशी मृत बालकांची नावे आहेत.

या दुर्घटनेमुळे देऊळगाव माळी आणि लोणार परिसरात शोककळा पसरली असून, संतप्त ग्रामस्थांनी संबंधित कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप केला आहे. तसेच कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

नातेवाईकांसोबत कोराडी प्रकल्प परिसरात गेले होते….

मिळालेल्या माहितीनुसार, आयान आणि आवेद हे दोघे नातेवाईक शेख आसिफ शेख हुसेन यांच्यासोबत कोराडी धरण परिसरात गेले होते. या परिसरातून देऊळगाव माळी, सुलतानपूर आणि लोणार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनांचे प्लांट आहेत.

पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी संबंधित ठिकाणी मोठा आणि खोल खड्डा खोदण्यात आला होता. काम पूर्ण झाल्यानंतर हा खड्डा बुजवणे अथवा परिसराला संरक्षक कुंपण घालणे आवश्यक असतानाही तो उघडा ठेवण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दुर्घटना….

धरणातील पाणी या खड्ड्यात साचल्याने पाण्याची खोली सहज लक्षात येत नव्हती. दोन्ही बालक पाय धुण्यासाठी पाण्यात उतरले असता ते खोल पाण्यात ओढले गेले. त्यांच्यासोबत असलेल्या शेख आसिफ यांनी प्रसंगावधान राखून एका मुलाला सुरक्षित बाहेर काढल्याची माहिती आहे. मात्र, आयान आणि आवेद यांचा शोध लागला नाही.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने शोधकार्य सुरू केले. रात्री उशिरा आयान शेख याचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. तर दुसऱ्या बालकाचा शोध रविवारी सकाळी खाजगी पाणबुडी पथकाच्या मदतीने घेण्यात आला. कृष्णा आगळे व माऊली आगळे (हरशी, पैठण) यांच्या पथकाने आवेद शेख याचा मृतदेह शोधून बाहेर काढला.

सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव असल्याचा आरोप….

या ठिकाणी धोकादायक खड्डा असूनही सुरक्षेचे कोणतेही उपाय, संरक्षक व्यवस्था अथवा सूचना फलक लावण्यात आले नसल्याचा आरोप पीडित कुटुंबीय व ग्रामस्थांनी केला आहे. कंत्राटदाराच्या कथित निष्काळजीपणामुळेच दोन निष्पाप बालकांचा जीव गेल्याचा आरोप करत संबंधित कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, या प्रकरणात प्रशासन व पोलिसांकडून करण्यात येणाऱ्या चौकशीत नेमकी जबाबदारी कोणाची आहे, सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या का आणि कामाच्या ठिकाणी नियमांचे पालन झाले होते का, याबाबत स्पष्टता होणे अपेक्षित आहे.

या घटनेमुळे देऊळगाव माळी आणि लोणार परिसरावर शोककळा पसरली असून, दोन चिमुकल्यांच्या दुर्दैवी मृत्यूने परिसर हळहळला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!