अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्युज): देऊळगाव राजा तालुक्यातील सरंबा फाटा येथून आधार कार्डची KYC करण्यासाठी जात असल्याचे सांगून घराबाहेर पडलेली २५ वर्षीय विवाहित महिला आपल्या दोन वर्षांच्या मुलीसह बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी अंढेरा पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद करण्यात आली असून पोलिसांकडून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येणूबाई तेजराव बर्डे (वय ५८, रा. सरंबा फाटा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून वर्षा गणेश पवार (वय २५, रा. वझर कुठे, ता. सेनगाव, जि. हिंगोली) व तिची दोन वर्षीय मुलगी आराध्या गणेश पवार या बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
वर्षा पवार ही मुलीसह आईला भेटण्यासाठी सरंबा फाटा येथे आली होती. दरम्यान, २७ मे रोजी सकाळी आधार कार्डची KYC करण्यासाठी देऊळगाव मही येथे जात असल्याचे सांगून ती मुलगी आराध्याला सोबत घेऊन घरातून बाहेर पडली. मात्र दिवस संपल्यानंतरही ती परत न आल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली.
नातेवाईक, मित्रपरिवार तसेच तिचा पती गणेश पवार यांच्याकडे चौकशी करूनही दोघींचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही. अखेर कुटुंबीयांनी अंढेरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या प्रकरणाचा पुढील तपास हेडकॉन्स्टेबल मारुती कायंदे करीत असून बेपत्ता माय-लेकीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.













