Advertisement Advertisement

खडकपूर्णेत रेती तस्करांचा धुमाकूळ; खडकपूर्णेत रेती चोरी जोमात; कारवाईआधीच तस्करांना मिळतोय इशारा?

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील खडकपूर्णा नदीपात्र आणि धरण परिसरातून सुरू असलेल्या रेतीच्या अवैध उपशामुळे महसूल विभागासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. अवैध रेती उपसा आणि वाहतूक रोखण्यासाठी महसूल विभागाने विशेष भरारी पथके तैनात केली असली, तरी प्रत्येक वेळी कारवाईपूर्वीच तस्कर सतर्क होत असल्याने प्रशासनाच्या हालचालींची गोपनीय माहिती आधीच लीक होत असल्याची गंभीर चर्चा रंगली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, महसूल विभागातील काही कनिष्ठ कर्मचाऱ्यांकडूनच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हालचाली, नियोजित धाडी आणि पथकांच्या कारवायांची माहिती रेती तस्करांपर्यंत पोहोचवली जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे तस्कर प्रशासनापेक्षा एक पाऊल पुढे राहून कारवायांना चकवा देत असल्याचे चित्र दिसत आहे.

खडकपूर्णा नदीपात्र आणि धरण परिसर हा सध्या संपूर्ण जिल्ह्यातील रेती तस्करांसाठी ‘हॉटस्पॉट’ ठरला असून दिवस-रात्र अवैध उपसा सुरू असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. महसूल विभागाकडून वेळोवेळी धाडी टाकल्या जात असल्या, तरी कारवाईपूर्वीच तस्कर पसार होत असल्याने या मोहिमा निष्फळ ठरत असल्याची चर्चा आहे.

या प्रकारामुळे महसूल विभागातील अंतर्गत संगनमताचा संशय बळावला असून, काही अधिकारी-कर्मचाऱ्यांचे तस्करांशी ‘आतील संबंध’ असल्याच्या आरोपांमुळे विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जर ग्रामपातळीवरील महसूल कर्मचारी कर्तव्यात कसूर करत असल्याचे आढळून आले, तर त्यांची सखोल चौकशी करून अहवाल वरिष्ठ कार्यालयाला सादर करण्यात येईल, असा इशारा तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांनी दिला आहे.

दरम्यान, खडकपूर्णा परिसरातील अवैध रेती उपशामुळे पर्यावरणीय हानी, नदीपात्राचे नुकसान आणि शासन महसुलाचे मोठे नुकसान होत असल्याने या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे. आता महसूल विभागातील ‘माहिती लीक’ प्रकरणाची चौकशी होणार का, आणि रेती तस्करांवर खरोखरच लगाम बसणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!