Advertisement Advertisement

“मागं मी पाजली, आता तुम्ही पाजा” म्हणताच काका भडकला! घरातून सुरा आणला अन् भाच्यावर सपासप वार; साकेगावात राडा, २९ वर्षांचा तरुण गंभीर!

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : दारू पाजण्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या शाब्दिक वादाचे रूपांतर थेट जीवघेण्या हल्ल्यात झाल्याची धक्कादायक घटना चिखली तालुक्यातील साकेगाव येथे २४ ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास घडली. मावस काकाने धारदार चाकूने केलेल्या हल्ल्यात २९ वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांकडे दाखल तक्रारीनुसार, शंकर पुंडलिक नाडे हा आपल्या गावातील मावस काका महादेव भिका भालेराव यांच्या घरी गेला होता. यावेळी शंकरने, “मागच्या महिन्यात मी तुम्हाला दारू पाजली होती, आज तुम्ही मला दारू पाजा,” असे म्हटले. त्यावर महादेव यांनी आपल्याकडे दारू नसल्याचे सांगून तेथून निघून जाण्यास सांगितले. याच कारणावरून दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली.

वाद झाल्यानंतर शंकर घराकडे निघाला असता, महादेव याने घरातून सुरा आणून त्याचा पाठलाग केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यानंतर त्याने शंकरच्या डोक्यावर, चेहऱ्याच्या खालील भागावर, पाठीवर तसेच दोन्ही हातांच्या तळव्यांवर चाकूने वार केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

हल्ल्यात गंभीर जखमी झालेला शंकर रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर कोसळला. त्याचा आरडाओरड ऐकून गल्लीतील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत त्याची सुटका केली. त्यानंतर नातेवाइकांनी त्याला तातडीने चिखली येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.

या प्रकरणी रायपूर पोलिसांनी महादेव भालेराव याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९(१) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास रायपूर पोलीस करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!