पाडळी शिंदे (बुलडाणा कव्हरेज न्युज) : देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीतील शिवणी आरमाळ येथे रामा शंकर शिंदे (रा. शिवणी आरमाळ) यांचा २३ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी त्यांच्या राहत्या घरी मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामा शिंदे यांचे लग्न होत नसल्याने तसेच ते मद्यपानाच्या आहारी गेल्याने मानसिक त्रासात असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. या त्रासातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती त्यांच्या भावाने पोलिसांना दिली आहे.
घटनेची माहिती मिळताच अंढेरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी मृतकाचा भाऊ लक्ष्मण शंकर शिंदे (वय ३५, रा. शिवणी आरमाळ) यांनी अंढेरा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
या घटनेचा पुढील तपास अंढेरा पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल मारुती कायंदे करीत आहेत. पोलिसांकडून घटनेची आवश्यक चौकशी सुरू आहे.













