उदयनगर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : गावालगतच्या शेतातील कोंबड्यांच्या शेडमध्ये रात्रीच्या सुमारास बिबट्याने घुसून धुमाकूळ घातल्याची घटना २४ ऑगस्ट रोजी सकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास टाकरखेड हेलगा परिसरात उघडकीस आली. या हल्ल्यात तब्बल १५० ते २०० कोंबड्यांचा मृत्यू झाला असून शेतकरी सुधाकर आयाजी हेलगे यांचे जवळपास एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.
टाकरखेड हेलगा येथील सुधाकर हेलगे यांचे गावाच्या उत्तरेस शेत आहे. शेताजवळ गाव तलाव असून शेताला लागूनच ज्ञानगंगा अभयारण्य आहे. या शेतात कोंबड्यांसाठी शेड तसेच दूध देणाऱ्या जनावरांसाठी गोठा आहे.
रात्रीच्या वेळी बिबट्या कोंबड्यांच्या शेडमध्ये शिरला. त्याने काही कोंबड्यांवर हल्ला करून त्यांना फस्त केले, तर बिबट्याच्या धुमाकुळामुळे मोठ्या संख्येने कोंबड्या मृत्युमुखी पडल्या. पहाटे पाच वाजताच्या सुमारास सुधाकर हेलगे हे नेहमीप्रमाणे दूध काढण्यासाठी शेतात गेले असता त्यांना बिबट्या जाळीत अडकलेला दिसला.
बिबट्या जाळीत अडकल्याची माहिती परिसरात पसरताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. मात्र, गर्दी वाढल्याने बिबट्याने जोर लावत जाळीतून स्वतःची सुटका करून घेतली आणि तेथून पळ काढला. हा बिबट्या जवळपास तीन ते चार तास जाळीत अडकून पडल्याचे सांगण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृत कोंबड्यांची पाहणी करून नुकसानीचा पंचनामा केला. शासनाच्या नियमानुसार नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी सुधाकर हेलगे यांनी केली आहे.
अभयारण्याला संरक्षण कुंपणाची गरज….
करवंड, टाकरखेड हेलगा, डासाळा, हरणी यासह अनेक गावांच्या शिवाराला ज्ञानगंगा अभयारण्य लागून आहे. मात्र, अभयारण्याच्या परिसराला संरक्षण भिंत किंवा जाळीचे कुंपण नसल्याने वन्यप्राणी वारंवार बाहेर पडून शेतशिवारात येत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
अभयारण्यातून हरीण, रोही यांसारखे प्राणी बाहेर पडून शेती परिसरात येतात. त्यांच्या मागावर हिंस्र प्राणीही गावालगतच्या भागात येण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे मानव तसेच पाळीव जनावरांवरील हल्ल्यांच्या घटना वाढत असल्याची चिंता परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
ज्ञानगंगा अभयारण्याला संरक्षण भिंत अथवा जाळीचे कुंपण उभारून वन्यप्राण्यांचा गावाकडे होणारा वावर रोखावा, अशी मागणी आता परिसरातील ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे.













