Advertisement Advertisement

कर्जानं पाठ सोडली नाय, नापिकीनं जगणं मुश्किल केलं; जामठीच्या ३९ वर्षांच्या शेतकऱ्याचा जीव गेला!

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील जामठी येथील ३९ वर्षीय अल्पभूधारक शेतकरी शरद नारायण तायडे यांनी विषारी औषध प्राशन केल्याची घटना २२ ऑगस्ट रोजी घडली. त्यांच्यावर बुलढाणा शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान रविवार, २३ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने तायडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शरद तायडे यांच्याकडे जामठी शिवारात गट क्रमांक १०२ मध्ये सुमारे तीन एकर शेती आहे. २२ ऑगस्ट रोजी त्यांनी आपल्या शेतात विषारी औषध प्राशन केले. ही बाब नातेवाईकांच्या निदर्शनास येताच त्यांना तातडीने बुलढाणा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांकडून उपचार सुरू असतानाच २३ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे ५ वाजता त्यांचा मृत्यू झाला.

शरद तायडे हे अल्पभूधारक शेतकरी असून त्यांच्यावर ग्रामीण बँकेचे कर्ज होते. शेतीतील सततची नापिकी आणि वाढत जाणारा कर्जाचा भार यामुळे ते आर्थिक विवंचनेत असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले.

घरातील कर्ता पुरुष गेल्याने तायडे कुटुंबीयांवर मोठे संकट ओढवले आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि चार बहिणी असा मोठा आप्त परिवार आहे. या घटनेमुळे जामठी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!