Advertisement Advertisement

शिक्षकासाठी पालकांचा संताप; उऱ्हा जिल्हा परिषद शाळेला कुलूप! पाच तास ठिय्या आंदोलन; तात्पुरता शिक्षक देण्याचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे…

मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज): वारंवार पाठपुरावा करूनही शाळेला शिक्षक मिळत नसल्याने संतप्त पालक आणि ग्रामस्थांनी अखेर गुरुवारी, ११ सप्टेंबर रोजी उऱ्हा

येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला कुलूप ठोकून प्रशासनाचा निषेध केला. शाळा व्यवस्थापन समितीसह ग्रामस्थांनी तब्बल पाच तास शाळेच्या आवारात ठिय्या आंदोलन केले. अखेर दुपारी तीनच्या सुमारास तात्पुरत्या शिक्षकाची नियुक्ती करण्याचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

उऱ्हा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकाची रिक्त जागा भरण्यासाठी ग्रामस्थांकडून गेल्या अनेक दिवसांपासून शिक्षण विभागाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता. यापूर्वी १९ ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद कार्यालयाच्या आवारात प्रत्यक्ष शाळा भरवून शिक्षकाच्या मागणीसाठी आंदोलन केले होते. त्यावेळी प्रशासनाने शिक्षक नियुक्तीचे पत्र देऊन आंदोलन शांत केले होते. मात्र, त्यानंतर तब्बल २२ दिवस उलटूनही संबंधित शिक्षक शाळेत रुजू न झाल्याने ग्रामस्थांचा संताप अनावर झाला. अखेर गुरुवारी सकाळीच पालक व ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकत आंदोलन सुरू केले.

आंदोलनाची माहिती मिळताच केंद्रप्रमुखांनी घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, केवळ कागदी आश्वासने नकोत, तर प्रत्यक्ष शिक्षक शाळेत हजर झाला पाहिजे, अशी ठाम भूमिका पालकांनी घेतली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मोताळा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी दामोदर पाटील यांनी दुपारी अडीच वाजता उहा शाळेला भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली.

शाळेतील मूळ शिक्षक मंगेश भोरसे हे आजारी रजेवर असल्याने त्यांच्या जागी महाळुंगी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक श्रीकृष्ण कोरडे यांची तात्पुरती नियुक्ती करण्यात येत असल्याचे लेखी पत्र गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दिले. त्यानंतर पालक आणि ग्रामस्थांनी आंदोलन तात्पुरते मागे घेतले.

या आंदोलनात संदीप तायडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तुकाराम पाटील, उबाठा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शुभम घोगटे, विजय सोनोने, रोहित राजपूत, सचिन राजपूत, दीपक दीक्षित, प्रीतम बयस, श्रीकृष्ण सोनोने, प्रवीण ढेकळे, शंकर पाटील यांच्यासह पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Join WhatsApp

Join Now

Latest Stories

Leave a Comment

WhatsApp Join Group!