Advertisement Advertisement

अरे बापरे..! जिल्ह्यातून २४ तासांत तब्बल १० जण गायब; बेपत्ता प्रकरणांनी जिल्ह्यात खळबळ…

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): जिल्ह्यात गेल्या २४ ते ४८ तासांत तब्बल १० जण बेपत्ता झाल्याच्या घटनांनी खळबळ उडाली आहे. महिला, तरुणी आणि मुलांच्या सलग बेपत्ता होण्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

मेहकर, बुलढाणा शहर, सिंदखेडराजा, धामणगाव बढे, खामगाव आणि मलकापूर या विविध पोलीस स्टेशन हद्दीतून एकामागून एक बेपत्ता होण्याच्या घटना समोर आल्या आहेत. यामध्ये काही प्रकरणे अत्यंत धक्कादायक असून संपूर्ण कुटुंबच गायब झाल्याने चिंता अधिकच वाढली आहे.

मेहकर तालुक्यातील सुलतानपूर येथील अनुराधा राजेश टकले (वय ३०) या आपल्या चार मुलांसह २२ मार्च रोजी घरातून बाहेर पडल्या. अमृता (१३), गौरी (१२), ऋतुजा (१०) आणि अनिकेत (६) अशी चारही मुले त्यांच्या सोबत होती. “स्वाहेरून येते” असे सांगून घरातून निघालेल्या या मायलेकरांचा अद्याप काहीही पत्ता लागलेला नाही. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

बुलढाणा शहरातील बसस्थानकावरून वैशाली दिलीप काळे (वय १८) ही कॉलेजला जात असल्याचे सांगून निघाली; मात्र त्यानंतर ती बेपत्ता झाली. तिच्या डाव्या हातावर ‘वैशाली’ असे टॅटू असून तिचा मोबाईलही बंद येत असल्याने कुटुंबीय चिंतेत आहेत.

सिंदखेडराजा तालुक्यातील महारखेड येथील कविता शंकर डिगोळे (वय २७) यांना त्यांच्या नातेवाईकांनी बसस्थानकावर सोडले होते; मात्र त्या माहेरी पोहोचल्याच नाहीत. सार्वजनिक ठिकाणांवरून महिलांचे बेपत्ता होणे गंभीर बाब मानली जात आहे.

मलकापूर येथील कोलते महाविद्यालयात गेलेली धनश्री नथ्यू चौधरी (वय १९) सायंकाळी घरी परतली नाही. तर खामगाव येथील शिवाजीनगर परिसरातून दिक्षा उर्फ साक्षी किशोर गवई (वय २०) ही “फोन आला” असे सांगून बाजूला गेल्यानंतर बेपत्ता झाली. या प्रकरणात प्रेमसंबंधाचा संशय व्यक्त केला जात असला तरी, भरवस्तीतून तरुणी गायब होणे ही गंभीर बाब ठरत आहे.

या सर्व घटनांमुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांकडून तातडीने कारवाईची मागणी होत आहे. केवळ ‘मिसिंग’ची नोंद करून थांबण्याऐवजी पोलीस प्रशासनाने सायबर सेल व स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने शोधमोहीम तीव्र करावी, अशी मागणी होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!