जळगाव जामोद (बुलडाणा कव्हरेज न्युज) : जळगाव जामोद तालुक्यातील आदिवासीबहुल चारवन गावात गुरुवारी एक दुर्मीळ घटना घडली. गावातील २७ वर्षीय रियानी पंशीराम सस्त्या यांनी घरच्या घरी झालेल्या प्रसूतीदरम्यान एकाच वेळी तीन मुलगे आणि एका मुलीला जन्म दिला. एकाच प्रसूतीत चार बाळांचा जन्म झाल्याने या अनोख्या घटनेची सध्या परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.प्रसूतीनंतर माता आणि चारही नवजात बालकांना तातडीने जळगाव जामोद ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी करून उपचार सुरू केले. माता आणि चारही बालकांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.मात्र, चारही नवजात बालकांचे वजन कमी असल्याने त्यांना पुढील विशेष उपचार व वैद्यकीय देखरेखीसाठी खामगाव येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
नवजात बालकांना आवश्यक उपचार मिळावेत यासाठी डॉक्टरांकडून विशेष काळजी घेतली जात आहे.लाखो प्रसूतींमध्ये एखादीच घटनावैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, एकाच वेळी चार बाळांचा जन्म होणे ही अत्यंत दुर्मीळ घटना मानली जाते. अशा प्रसूतीमध्ये नवजात बालकांचे वजन कमी असण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे अशा बालकांना जन्मानंतर विशेष वैद्यकीय देखरेखीची आवश्यकता भासू शकते.दरम्यान, चारवन गावासह संपूर्ण जळगाव जामोद तालुक्यात या अनोख्या प्रसूतीची चर्चा रंगली आहे.
तीन मुलगे आणि एका मुलीच्या जन्मामुळे कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण असून, माता आणि चारही चिमुकल्यांच्या उत्तम आरोग्यासाठी नागरिकांकडून शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.
















