चिखलीत शेतकऱ्यांचा संताप; पालकमंत्र्यांच्या शोधासाठी पोलीस ठाण्यात धाव! ‘काजू-बदाम घ्या, पण शेतकऱ्यांच्या बांधावर या’च्या घोषणांनी परिसर दणाणला; दुष्काळ जाहीर करून हेक्टरी १ लाखांची मदत देण्याची मागणी…..
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागांत गेल्या जवळपास ५० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. सोयाबीन, तूर, कापूस, उडीद आदी पिके करपण्याच्या स्थितीत असून, पावसाअभावी शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. मात्र, अशा गंभीर परिस्थितीत जिल्ह्याचे पालकमंत्री व सहपालकमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर दिसत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास कणखर आणि क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी चिखली पोलीस ठाण्यात धाव घेतली.
शेतकऱ्यांनी चिखली पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांमार्फत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तक्रार अर्ज सादर करून जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीकडे शासनाचे लक्ष वेधले. तहसीलदार व पोलीस प्रशासनाकडेही शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या मांडल्या. यावेळी “काजू-बदाम घ्या, पण शेतकऱ्यांच्या बांधावर या”, “शोधून द्या, शोधून द्या, पालकमंत्री शोधून द्या” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. केवळ बैठका आणि चर्चांमध्ये वेळ न घालवता प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन पिकांची परिस्थिती पाहावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.
‘बैठका नको, शेतकऱ्यांच्या बांधावर या’…..
दुष्काळसदृश परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी पालकमंत्री व सहपालकमंत्र्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील बाधित भागांना भेटी देऊन शेतकऱ्यांशी थेट संवाद साधावा, अशी मागणी करण्यात आली. पिकांची सद्यस्थिती, पाण्याची उपलब्धता आणि आगामी रब्बी हंगामातील अडचणी जाणून घेणे गरजेचे असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. ‘बैठका नकोत, शेतकऱ्यांच्या बांधावर या’, असा सूर यावेळी आंदोलकांनी व्यक्त केला.
दुष्काळ जाहीर करून हेक्टरी १ लाखांची मदत द्या….
बुलढाणा जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त परिस्थितीची तातडीने दखल घेऊन दुष्काळग्रस्त क्षेत्र जाहीर करावे आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. तसेच पिकांच्या नुकसानीचे तातडीने सर्वेक्षण करून पात्र शेतकऱ्यांना शासकीय मदत द्यावी, आगामी रब्बी हंगामासाठी बियाणे व पाण्याची उपलब्धता करून द्यावी, अशी मागणीही करण्यात आली.
पालकमंत्री व सहपालकमंत्र्यांनी तातडीने जिल्ह्यात येऊन दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करावी, शेतकऱ्यांशी थेट संवाद साधावा आणि त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी तक्रार अर्जातून करण्यात आली आहे. मागण्यांकडे तातडीने लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला.
यावेळी देविदास कणखर, विनायक सरनाईक, उद्धव थुट्टे, मुरलीधर येवले, विठ्ठल सोळंकी, शेषराव शेळके, रवि टाले, राजू शेटे, गजानन कुटे, समंथा मोरे, रामदास शेळके, पांडुरंग घुबे, दत्ता शेळके, केशव म्हळसणे, पुरुषोत्तम म्हळसणे, मधुकर ठेंग यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.














