संग्रामपूर (बुलडाणा कव्हरेज न्युज): शेतशिवारात लोकवर्गणीतून उभारलेल्या श्री आनंदेश्वरी दुर्गामातेच्या मंदिराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने पितळी समई, पितळी साहित्य, चांदीचे डोळे तसेच दानपेटीतील रोकड असा सुमारे १० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना संग्रामपूर शिवारातील गट क्रमांक १२० मधील शेतात घडली. १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ही चोरी उघडकीस आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुनील अंबादास राजनकार यांच्या शेतात लोकवर्गणीतून श्री आनंदेश्वरी दुर्गामातेचे मंदिर बांधण्यात आले आहे. मंदिराची देखभाल तसेच दैनंदिन आरती राजनकार यांच्या आई-वडिलांकडून केली जाते. मंदिराच्या लोखंडी दरवाजाला कुलूप लावण्यात आले होते.
दरम्यान, १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सुनील राजनकार शेतात गेले असता त्यांना मंदिराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. मंदिरात जाऊन पाहणी केली असता दोन जुन्या पितळी समई, चार पितळी वस्तू, सुमारे पाच ग्रॅम वजनाचे चांदीचे डोळे तसेच लोखंडी दानपेटी आणि त्यातील अंदाजे दोन हजार रुपयांची रोकड गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
चोरीची माहिती मिळताच राजनकार यांनी मंदिर परिसरासह आजूबाजूच्या शेतशिवारात चोरीस गेलेल्या साहित्याचा शोध घेतला; मात्र कोणताही मुद्देमाल मिळून आला नाही. याप्रकरणी सुनील अंबादास राजनकार यांनी तामगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.












