मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : किराणा सामानाची गाडी शेजारील दुकानाच्या लोखंडी बोर्डाला लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून धामणगाव बढे येथे दोन गटांत जोरदार वाद होऊन मारहाण झाल्याची घटना घडली. या प्रकरणात दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या असून, धामणगाव बढे पोलिसांनी एकूण ११ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.
एका ४५ वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, तिचा मुलगा किराणा सामानाची गाडी घेऊन आला असता गाडीचा धक्का रमेश चवरे यांच्या दुकानाच्या लोखंडी बोर्डाला लागला. यावरून सुरुवातीला किरकोळ वाद झाला; मात्र तो वाद त्यावेळी मिटला होता. त्यानंतर रविवारी दुपारी सुमारे १.२५ वाजता रमेश सुभाष चवरे, गणेश सुभाष चवरे, विशाल हरी बिछवे व अन्य तीन अज्ञात व्यक्तींनी बेकायदेशीर जमाव करून दुकानात प्रवेश केला. यावेळी अश्लील शिवीगाळ करत मुलाला लाथाबुक्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या महिलेला हात पकडून विनयभंग करण्याचा प्रयत्न करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.
या तक्रारीवरून धामणगाव बढे पोलिसांनी रमेश चवरे, गणेश चवरे, विशाल बिछवे आणि तीन अज्ञात व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ७४, १८९(२), १९०, ११५(२), २९६, ३५२ आणि ३५१(३) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, कृषी केंद्र व्यावसायिक रमेश सुभाष चवरे यांनीही पोलिसांत फिर्याद दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, एकनाथ किन्होळकर याने सामानाची गाडी त्यांच्या दुकानासमोर लावून लोखंडी बोर्डाला धडक दिली. याबाबत जाब विचारला असता एकनाथ किन्होळकर, अभय किन्होळकर, श्रीकृष्ण किन्होळकर, एक महिला आणि ‘गोल्या’ अशा पाच जणांनी बेकायदेशीर जमाव जमवून चापटा-बुक्यांनी मारहाण केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिली.
या फिर्यादीवरून धामणगाव बढे पोलिसांनी एकनाथ किन्होळकर यांच्यासह पाच जणांविरुद्ध BNS २०२३ मधील कलम १८९(२), १९०, २९६, ११५(२), ३५१(२) आणि ३५१(३) अन्वये गुन्हा नोंदविला आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पुढील तपास धामणगाव बढे पोलीस करीत आहेत.












