चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): ‘गाव करी ते राव न करी’ ही म्हण मिसाळवाडी ग्रामस्थांनी अक्षरशः खरी करून दाखवली. जिल्हा परिषद शाळेवर वादग्रस्त पार्श्वभूमी असलेल्या शिक्षकाची नियुक्ती खपवून घेणार नसल्याची ठाम भूमिका घेत ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकत आंदोलनाचा एल्गार पुकारला. ग्रामस्थांच्या आक्रमक पवित्र्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने अखेर एक पाऊल मागे घेत संबंधित शिक्षकाची नियुक्ती रद्द केल्याचे जाहीर केले.
मिसाळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक अनिल दांडगे यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती मिळताच गावात तीव्र असंतोष निर्माण झाला होता. दांडगे यांच्या वादग्रस्त पार्श्वभूमीचा दाखला देत त्यांची नियुक्ती आपल्या गावातील शाळेवर करू नये, अशी स्पष्ट भूमिका ग्रामस्थांनी घेतली. यासंदर्भात ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांची भेट घेऊन निवेदनही दिले होते.
मात्र, निवेदन देऊनही अपेक्षित कार्यवाही होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी वाढत गेली. प्रशासनाकडून राजकीय दबावाचे कारण पुढे करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. तसेच मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांवर दबाव आणून संबंधित शिक्षकाला रुजू करून घेण्याचे निर्देश दिल्याचा गंभीर आरोपही ग्रामस्थांनी केला.
या प्रकारामुळे पालकांचा संयम सुटला. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि शाळेतील वातावरण सुरळीत राहावे, यासाठी संतप्त ग्रामस्थ आणि शाळा व्यवस्थापन समितीने एकत्र येत शाळेला कुलूप ठोकले. दांडगे यांची नियुक्ती रद्द न केल्यास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला होता.
ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा आणि संभाव्य आंदोलनाची परिस्थिती लक्षात घेता जिल्हा परिषद प्रशासनाने अखेर निर्णय घेत अनिल दांडगे यांची मिसाळवाडी शाळेवरील नियुक्ती रद्द केल्याचे जाहीर केले. त्यामुळे ग्रामस्थांच्या आंदोलनाला यश आले असून, प्रशासनाच्या निर्णयाचे समाधान ग्रामस्थांनी व्यक्त केले.
‘विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित डोळ्यासमोर ठेवूनच गावकऱ्यांनी ही लढाई लढली. वादग्रस्त शिक्षकाची नियुक्ती रद्द करून प्रशासनाने उशिरा का होईना शहाणपण दाखवले आहे. आता वेळ न दवडता जिल्हा परिषद प्रशासनाने आमच्या शाळेला तातडीने चांगला आणि समर्पित शिक्षक उपलब्ध करून द्यावा,’ अशी मागणी मिसाळवाडीचे उपसरपंच हनुमान मिसाळ यांनी केली.













