Advertisement Advertisement

जिल्ह्यात बेपत्ता सत्र सुरूच…! चिखली-मिसाळवाडी-हिवरखेडमध्ये ३ जण बेपत्ता…

बुलढाणा(बुलडाणा कव्हरेज न्युज)जिल्ह्यात तरुण मुले-मुली बेपत्ता होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मलकापूर येथील विवाहिता बेपत्ता प्रकरण ताजे असतानाच चिखली, मिसाळवाडी आणि हिवरखेड परिसरातून तीन जण बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

चिखली येथील राऊतवाडी परिसरातून ऋषिकेश साडू काकफळे (वय २४, रा. चांडोळ) हा युवक २८ मार्च रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घरातून बाहेर पडला, मात्र तो अद्याप परतलेला नाही. कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतल्यानंतरही त्याचा काहीच मागमूस लागला नाही. अखेर ३१ मार्च रोजी त्याच्या आई सरीता काकफळे यांच्या तक्रारीवरून चिखली पोलिसांत मिसिंग दाखल करण्यात आली आहे. त्याचा रंग सावळा, उंची सुमारे साडेपाच फूट व सडपातळ बांधा आहे.

दरम्यान, हिवरखेड पोलीस स्टेशन हद्दीतील वझर (ता. खामगाव) येथील अम्नम्रपाली विठ्ठल वाकोडे (वय २२) ही तरुणी ३० मार्च रोजी रात्री संशयास्पदरीत्या बेपत्ता झाली. ती शेजारील नातेवाईकांकडे झोपण्यासाठी गेली होती, मात्र दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत घरी परतली नाही. नातेवाईकांकडे शोध घेतल्यानंतरही ती आढळून न आल्याने तिची आई कल्पना वाकोडे यांच्या फिर्यादीवरून हिवरखेड पोलिसांत मिसिंग नोंदविण्यात आली आहे. तिचा रंग गोरा, उंची ५ फूट २ इंच असून अंगात काळा-पांढरा टॉप, काळी लेगिंग्स तसेच सोन्याचे दागिने (कानातील गुढे, नथ) असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

तसेच, चिखली तालुक्यातील मिसाळवाडी येथील पायल भीमराव शिनगारे (वय १८) ही तरुणीही ३० मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास बेपत्ता झाली आहे. ‘गच्चीवर झोपायला जाते’ असे सांगून ती घरातून बाहेर पडली, मात्र त्यानंतर परतलीच नाही. कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतल्यानंतरही काहीच निष्पन्न झाले नाही. याप्रकरणी तिचे वडील भीमराव शिनगारे यांच्या तक्रारीवरून ३१ मार्च रोजी अंढेरा पोलिसांत मिसिंग दाखल करण्यात आली आहे.

या तिन्ही घटनांमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. नागरिकांनी कोणतीही संशयास्पद माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!