मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : मोताळा तालुक्यातील एका गावातील ३० वर्षीय विवाहित महिला अचानक बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. सदर महिलेला अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी पळवून नेल्याची तक्रार तिच्या पतीने बोराखेडी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १४०(३) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
बोराखेडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील रहिवाशाने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची ३० वर्षीय पत्नी ५ ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे ९.३० ते दुपारी १.३० वाजेच्या दरम्यान राहत्या घरातून अचानक निघून गेली. काही वेळाने त्या घरी नसल्याचे लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांनी तसेच पतीने परिसरात त्यांचा शोध घेतला. मात्र, त्या कुठेही आढळून आल्या नाहीत.
महिलेचा शोध घेऊनही ठावठिकाणा लागला नसल्याने पतीने कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी आपल्या पत्नीला पळवून नेल्याची शक्यता व्यक्त करत बोराखेडी पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ. अमोल खराडे करीत आहेत. बेपत्ता महिलेचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.














